पंढरपूर(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जीवनोपयोगी ज्ञान मिळावे, या उद्देशाने आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची पंढरपूर येथील मार्केट यार्ड येथे शैक्षणिक क्षेत्रभेट उत्साहात पार पडली.
या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतीमालाची खरेदी-विक्री प्रक्रिया, लिलाव पद्धती, मालाची प्रतवारी, वजनकाट्यांचा वापर, साठवणूक, वाहतूक व्यवस्था तसेच शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांचे कामकाज जवळून पाहिले. बाजार समितीच्या कार्यपद्धतीची माहिती घेत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात भर घातली. प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शेती अर्थव्यवस्था आणि बाजार व्यवस्थेचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, जिज्ञासा आणि व्यवहारज्ञान विकसित होण्यास मोठी मदत झाली. पुस्तकातील ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभवाशी सांगड घालत विद्यार्थ्यांनी ही क्षेत्रभेट आनंददायी आणि ज्ञानवर्धक असल्याची भावना व्यक्त केली.
या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री घंटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शीतल होनराव, लक्ष्मी बोडके, ऐश्वर्या कुलकर्णी, तृप्ती वाठारकर, श्वेता डोईफोडे, श्वेता ताड आणि सौ. दगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नियोजनबद्ध सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष सतीशजी पुरंदरे, संस्थेच्या माजी अध्यक्षा वीणाताई जोशी, रेखाताई उंबरकर, डॉ. अनिल जोशी, ॲड. ज्ञानेश आराध्ये, मा. आमदार श्री प्रशांत परिचारक, रेखाताई भालेराव, श्री प्रशांत कुलकर्णी, डॉ. तेजस भोपटकर आणि श्री प्रसाद संत या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे शाळेच्या अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या आदर्श प्राथमिक विद्यालयाचा हा उपक्रम पालक आणि शिक्षणप्रेमींनीही कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.

0 Comments