नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नावेळी बोलताना नमामि चंद्रभागा योजनेची अमलबजावणी कागदावरच असल्याचे निदर्शनास आणून देत या बाबत शासनाने एक कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणी केली होती.विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेच्या पात्रात असलेली प्रचंड घाण,दुर्गंधी तसेच शेवाळे आणि कचऱ्याचे ढीग यामुळे येथे आलेले भाविक प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसून येत होते.आमदार समाधान आवताडे यांनी मागील आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदी पत्रास अचानक भेट दिली असता त्या ठिकाणी दिसून आलेल्या बकाल अवस्थेबद्दल मोठी नाराजीही व्यक्त केली होती.तर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात देखील चंद्रभागा नदी प्रदूषणाची वारंवार निर्माण होणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेत नमामि चंद्रभागा योजनेच्या कार्यवाहीस गती देण्याची मागणी केली होती.आता शासनाने या ३० एप्रिल २०२५ रोजी नमामि चंद्रभागा योजनेच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याचे आदेश काढले आहेत. राज्य शासनाने ३० एप्रिल रोजी मंजुरी दिलेल्या नमामि चंद्रभागा कृती आराखड्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधीकारी स्तरावरील कार्यकारी समितीने कृती आराखड्याच्या प्रभावी अंलबजावणीची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नमामि चंद्रभागा योजनेची संपूर्ण कार्यवाही २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.तसेच जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ व त्यामध्ये वेळोवळी केलेल्या सुधारणांनुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ मधील तरतूदींनुसार प्रदूषण नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच प्रदूषणास कारणीभूत ठरणारे उद्योग / स्थानिक स्वराज्य संस्था/व्यक्ती यांच्यावर कायद्यातील विहीत तरतूदींनुसार आवश्यक कारवाई करणेबाबतची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी लागणार आहे.चंद्रभागा प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेने प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीचा खर्च भरपाई बंधनकारक करण्यात आली आहे.नगर विकास विभागाने दि.१२/०८/२०१६ व दि.०४/१०/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नमामि चंद्रभागा प्राधिकरण व नमामि चंद्रभागा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयानुसार करावयाच्या उपाययोजना याबाबत संबंधित विभागांनी आवश्यक दक्षता घ्यावी.संबंधित शासकीय कार्यालये/ मंडळे / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्थानिक नागरीक, पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्थानिक मंडळे, शाळा व महाविद्यालये यांना सदर आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सहभागी करून घ्यावे अशाही मार्गदर्शक सूचना शासनाने ३० एप्रिल रोजी नमामि चंद्रभागा योजनेच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देताना देण्यात आल्या आहेत.आ. समाधान आवताडे यांनी अधिवेशनातील उठविला होता मोठा आवाज .
0 Comments