स्वेरी मध्ये‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूरः ‘जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण ज्या गोष्टींचा सराव करत असता त्याच्यात सातत्य जपले पाहिजे. आपण कुठे चुकतो हे सरावातून समजते आणि ते दुरुस्त करता येते. यातून मिळणारे यश हे पूर्णपणे तुमच्या कृतीवर अवलंबून असते. तुम्ही काय विचार करता, तुम्ही वेळप्रसंगी काय निर्णय घेता, तुम्हाला काय वाटते यावर आपल्या कार्याची दिशा अवलंबून असते. कारण आपले मन म्हणजे एक कारखाना आहे. ज्यामध्ये अनंत विचारांची प्रक्रिया चालते.’ असे प्रतिपादन एमएसबीटीई चे माजी संचालक डॉ प्रकाश खोडके यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये मध्यवर्ती असलेल्या भव्य खुल्या रंगमंचावर भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३७ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजिलेल्या ‘शिक्षक दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एमएसबीटीई चे माजी संचालक डॉ प्रकाश खोडके हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे हे होते. महाराष्ट्र गीत आणि स्वेरीच्या सुमधुर गीताने व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रास्ताविकात संस्थेचे युवा सचिव डॉ.सुरज रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीची संस्कृती ही ‘गीव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट’ यावर आधारित आहे. यात कुठेही अंतर रहात असल्याचे दिसून येत नाही. याच आदरयुक्त संस्कारामुळे स्वेरीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.’ स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून स्वेरीची ओळख करून दिली. ते म्हणाले की ‘मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्यामुळे प्रत्येक क्षणी तो शिक्षण घेत असतो. हे करत असताना विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढविला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अनेक सल्ल्यामुळे स्वेरीची प्रगती झाली आहे.’ असे सांगून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडीवर प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘आपल्या नजरेतून दृष्टीकोन ठरत असतो त्यामुळे आपली दृष्टी चौकस असली पाहिजे. विद्यार्थी दशेत शिस्त महत्वाची आहे कारण स्वयंप्रकाशित होण्यासाठी शिस्त महत्वाची भूमिका बजावते.’ असे सांगून समुद्रातील जहाजाचे उदाहरण दिले. यावेळी प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्यासह चारही महाविद्यालयांतील प्राचार्यांचा व गुणवंत शिक्षकांचा ‘शिक्षक दिना’ निमित्त पाहुण्यांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वस्त एच .एम.बागल, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, संस्थेअंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस.व्ही.मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली करवीर, इतर महाविद्यालयांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. साक्षी भंडारे, तनिशा लांडगे व प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थिनी सचिवा स्नेहा झिरपे यांनी आभार मानले.
0 Comments