पंढरपूर- ‘आज विज्ञान हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे. आपल्या ज्ञानात विज्ञानामुळे अधिक भर पडत असते. विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर जीवनात सकारात्मक येते आणि चिकित्सक वृत्ती, जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते आणि मग आपल्यामधूनच शास्त्रज्ञ, उद्योजक घडत असतात. म्हणून आपल्या संशोधन प्रकल्पांचा समाजासाठी उपयोग व्हावा तरच आपल्याला त्यातून आनंद घेता येईल.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअयरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी केले.
राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये आयोजिलेल्या ‘५३ व्या सोलापूर जिल्हा स्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी २०२५-२६’ च्या समारोप प्रसंगी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार ह्या मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे हे होते. महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी प्रास्ताविकात ‘स्वेरीमध्ये आयोजिलेल्या विज्ञान व गणित प्रदर्शनासंबंधी माहिती दिली. प्रदर्शनाच्या दोन दिवसात अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले. त्यांना या काळात कोणतीही अडचण आली नसून उत्तम सोय केल्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रदर्शनातून प्राथमिक गटात प्रथम-बसवराज रविकांत तोळनुरे (प्रकल्प-सौर कृषी पंप), द्वितीय-विरोचंद सिद्धेश्वर कराळे (हॅन्ड डेस्टर कार), तृतीय- प्रेमराज आण्णासाहेब शेळके (ट्रान्समिशन लाईन), माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम -महेश श्रीमंत टेंगळे (स्मार्ट अॅग्रिकल्चर), द्वितीय- आयुब चारुदत्त लाड (स्मार्ट स्कूल) व तृतीय- जुनेद बाग्दावर शेख (ऊमन सेफ्टी अँड मल्टीपर्पज सेफ्टी), दिव्यांग गटातून प्राथमिक गटात प्रथम- सुप्री गजेंद्र शिंदे (जल, संधी, व्यवस्थापन), दिव्यांग गटातून माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम- गणेश महादेव निकम (अंडी उबवणे मशीन), प्राथमिक शिक्षक गटात प्रथम- विशाल विष्णुदास रेपाळ (माझी गणित शाळा), माध्यमिक शिक्षक गटात प्रथम- मंगेश अरविंद सोनटक्के (खेळातून जीएसटी आणि कृतीयुक्त आराखडा), योगशाळा व परिचर गटात प्रथम- शशिकांत हनुमंत शेंडे (निर्मिती वैज्ञानिक संकल्पना स्पष्टीकरण पूरक वैज्ञानिक व शैक्षणिक सहल) हे विद्यार्थी व शिक्षक विजेते ठरले असून त्यांची निवड राज्य पातळीवर झाली आहे. परीक्षकांना हे नंबर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. प्रा. शितल पाटील, प्रा. एस. डी. माळी, प्रा. एस. एस. गायकवाड, प्रा. पी.बी. लोखंडे, डॉ. एस. डी. भोसले, आदींनी परीक्षकांचे काम उत्तमरित्या पहिले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गायत्री गणेश गावंधरे व राष्ट्रमाता कन्या इंदिरा कन्या प्रशाला मोहोळचे सहशिक्षक औदुंबर मुळे यांनी स्वेरीतील दोन दिवस आलेला अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘या दोन दिवसांमध्ये स्वेरी कॅम्पस मध्ये ‘गैरसोय’ हा शब्द रजेवर गेला होता. परीक्षक प्रा. शितल पाटील म्हणाल्या की, ‘या प्रदर्शनाद्वारे बालवैज्ञानिकांना सुंदर व्यासपीठ मिळाले असून शाश्वत भारत घडविण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ निर्माण केले आहे’ अशी भावना व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व बालवैज्ञानिकांचे कौतुक केले ते म्हणाले ‘जे विजेते ठरले ते मोलाचे आहेत आणि जे उपयोविजिते ठरले ते देखील लाख मोलाचे आहेत. त्यामुळे पुरस्कार मिळाला नाही म्हणून नाराज न होता प्रकल्पामध्ये आणखी जोमाने संशोधन करावे.’ असे सांगून चिमुकल्या हातांनी सादर केलेल्या कल्पक बुद्धिमत्तेचे कौतुक केले. यावेळी स्वेरीतील विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या विज्ञान मंडळातील सर्व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राथमिक , माध्यमिक व शिक्षक गटातून तब्बल १३२ प्रकल्पांचे सादरीकरण केले गेले. यामध्ये बालवैज्ञानिकांमधून अद्भुत, बौद्धिक कल्पनांचे विशेष संशोधन आढळले तर हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळातील सदस्यांनी उत्कृष्ट परिश्रम करून हे प्रदर्शन यशस्वी केले. यावेळी जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व समन्वयक संजय भस्मे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू चव्हाण, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व सहसमन्वयक संजय जवंजाळ, नीलकंठ लिंगे, वरिष्ठ लिपिक मनोज साबळे, एस. डी. माळी, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू चव्हाण, सहनिरीक्षक अनिल बनसोडे, विज्ञान मंडळाचे पदाधिकारी, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, प्रा. ए.एस. भातलवंडे आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लटके यांनी केले तर विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

0 Comments