🛑 *खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून सोलापूर शहरातील अरविंद धाम येथे १० लाखांचा काँक्रिट रस्ता पूर्ण; लोकार्पण संपन्न*
*पैसा आणि EVMवर सत्ता मिळवणे हा लोकशाहीचा पाया नाही; सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही विरोधात, लोकशाही व संविधान रक्षणासाठी संघर्ष अटळ : खा. प्रणिती शिंदे*
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम (सन २०२५–२६) अंतर्गत सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ०७ मधील अरविंद धाम ते पोलिस वसाहत गेट, एस न्यूज मराठी मार्गे वाघमोडे यांच्या घरापर्यंतच्या काँक्रिट रस्ता कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दर्जेदार काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.
पूर्ण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, माजी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, काळे सर, वसंत जाधव, सुधीर पाटील, बालाजी सुरवसे, प्रकाश बिराजदार, शिवानंद जाधव, महेश चौरे, जयंत आराध्ये, सुरेश जगताप, बाळासाहेब बिडकर, अंकुश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूक सुलभ होणार असून पावसाळ्यातील अडचणींवरही कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. विकासकामांच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, पैसा आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडून येणे हा लोकशाहीचा पाया नसून, जनतेला दिलेल्या ताकदीचा वापर करून पुन्हा जनतेलाच सक्षम करणे हीच खरी लोकशाही असल्याचे ठाम मत व्यक्त केले.
गेल्या वर्षभरात निवडणुका आणि आचारसंहितेतच वेळ गेला. मात्र आता विकासकामांची उणीव भरून काढणे आणि प्रत्यक्ष कामाला गती देणे हेच आमचे तत्त्व, प्रथा आणि परंपरा आहे. कोणतेही काम असो, आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगत लोकशाही पद्धतीनेच कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मागील दहा वर्षांत लोकशाहीला हरताळ फासण्यात आला असून तिचा पाया ढासळत चालल्याची तीव्र टीका करण्यात आली. ईव्हीएम घोटाळा, पैशाचा प्रचंड वापर, पत्रकारांवर व विरोधी पक्षांवर टाकला जाणारा दबाव — या सगळ्यांतून एक प्रकारची अघोषित आणीबाणी देशात सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे मत मांडण्यात आले.
आमची लढाई ही सोशल मीडियापुरती मर्यादित नसून ती रस्त्यावरची आहे. ही लढाई आम्ही यापूर्वीही लढलो असून पुढेही लढत राहू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. आमच्या अंगात काँग्रेसचे रक्त असून लोकशाही, संविधान, सर्वधर्मसमभाव आणि हुकूमशाही प्रवृत्तींच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील, असे ठामपणे सांगण्यात आले.
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी या संघर्षात जनतेने खंबीर साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments