पंढरपूर- ‘अभ्यासातील कॉन्सेप्टस पूर्णपणे समजून घेऊन त्यांचे कोणत्याही भाषेत प्रभावी सादरीकरण करता आले पाहिजे. यासाठी सर्वप्रथम प्रत्येक गोष्ट मनापासून समजून घेतली पाहिजे. यासाठी इंटरनेटचा योग्य वापर केला पाहिजे. अभ्यास करताना प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे तरच प्रश्नाचे उत्तर सापडते कारण सध्या स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थ्यांसाठी आव्हान बनले आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांमधून शिस्त दिसून आली आणि हीच स्वयंशिस्त भविष्यात व स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप उपयोगी पडते.’ असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त (आयएएस) डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये ‘डीकोडिंग द ड्रीम्स: पाथ वे टू पब्लिक सर्विस अपॉर्च्युनीटीज्’ या विषयावर आयोजिलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शन सत्रात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त (आयएएस) डॉ. सचिन ओंबासे हे स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीताने या सत्राची सुरुवात झाली. दीपप्रज्वलनानंतर स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे म्हणाले की, ‘करिअर करताना आपल्याला योग्य दिशा मिळावी यासाठी स्वेरीमध्ये ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा’ची स्थापना केली असून या केंद्राच्या माध्यमातून आज आयुक्त डॉ. ओंबासे सरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल.’ असे सांगून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून ‘संस्थापक डॉ.बी. पी. रोंगे सर आणि ‘स्वेरी शिक्षण संस्था’ यांच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, विद्यार्थ्यांच्या यशासाठी स्वेरीमध्ये होत असलेले प्रयत्न, संशोधन विभागातील प्रकल्प व मिळालेले निधी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयएएस व अशा प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी, शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये विद्यार्थी आघाडीवर असतात अशा विविध बाबींवर प्रकाश टाकला. पुढे बोलताना आयुक्त डॉ. ओंबासे म्हणाले की, ‘सीईटी परीक्षा उत्तीर्ण करून आल्यानंतर स्वेरीमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या ठिकाणी येतात. यासाठी स्वेरीचे प्रथम आभार. स्वेरीही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविण्याचे अविरत कार्य करत आहे, हे खरोखर कौतुकास्पद आहे. शिक्षण पद्धतीत अलीकडचे विद्यार्थी हुशार आहेत. माझ्या घरी देखील शैक्षणिक वातावरण असल्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी पोषक वातावरण मला मिळाले. त्यामुळे मी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक मिळवत होतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देखील अवघड गेली नाही. आता मात्र यूपीएससीचे नियम बदलले असून आज यूपीएससी आणि एमपीएससी अशा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या हेतूने अभ्यासक्रम समान ठेवला आहे. यासाठी पदवी व त्यानंतरचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो. अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय अभ्यास यामध्ये असतो. अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, सामान्य शास्त्र हे प्रीलियम परीक्षेत विषय अभ्यासक्रम असतात. तरीही अवघड समजल्या जाणाऱ्या या स्पर्धा परीक्षेसाठी भारतातून पाच ते १० लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यातून पाच ते दहा हजार जण उत्तीर्ण होतात. यासाठी सातत्याने परिश्रम करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा देताना नियोजनात्मक अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो. इंजिनिअरिंग झाल्यावर प्रथम जॉब करावा त्यानंतर दोन तीन वर्षांनी स्पर्धा परीक्षा द्यावी. अनुभव न घेता जर परीक्षेला सामोरे गेले तर काही समजणार नाही. यासाठी प्रथम स्पर्धा परीक्षेची कन्सेप्ट पूर्णपणे समजून घ्या. कारण २० ते २३ हे वय वर्षे ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे करिअर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कोणीतरी सांगतय म्हणून स्पर्धा परीक्षा देवू नका. या स्पर्धेच्या युगामध्ये सेल्फ मोटिवेशन अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानदीप अॅकॅडमीचे अॅड. महेश शिंदे म्हणाले की, ‘स्पर्धा परीक्षा आव्हानात्मक असताना परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या व शेवटी यशस्वी होणाऱ्यांची संख्या यात फार मोठा फरक आढळतो. सध्याच्या युगात तक्रार करण्याचा स्वभाव बनलेला आहे. त्यात वेळ वाया जात आहे. म्हणून जीवनात मोठे व्हायचे असेल तर आत्ताच कम्प्लेंट करणे थांबवा. माणसं मोठी झाली की समाज मोठा होतो, श्रीमंती आली की लोक आंधळे होऊ लागतात यासाठी योग्य ठिकाणी डोकं लावणे आवश्यक असते. म्हणून व्हीजन मध्ये क्लिएरिटी हवी आणि आरोगन्स टाळा हे महत्त्वाचे तीन कानमंत्र अॅड. शिंदे यांनी दिले. वैभव खूपसे म्हणाले की, ‘ज्ञानदीप अॅकॅडमीच्या माध्यमातून स्वेरीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल आणि विशेष म्हणजे डॉ. सचिन ओंबासे यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरु करणार आहे.’ अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी श्रीकांत जाधव, शिंदे, विनोद आसबे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, डिप्लोमाच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी नवले, संस्थेअंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानेश्वर मिटकरी, सोनाली कांबळे आणि डॉ.नीता तळवलकर यांनी सूत्रसंचालन केले तर इंजिनिअरिंगच्या स्टुडंट कौन्सिलच्या सचिवा नेहा झिरपे यांनी आभार मानले.
चौकट-
१.आयुक्त डॉ.ओंबासे यांनी आयआरएस.,आयपीएस व आयएएस या तिन्ही परीक्षा दिल्या. तिन्ही महत्वाच्या स्पर्धां परीक्षेमध्ये त्यांनी कसे यश मिळविले याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.
२. ‘अभियंत्यांनी साकारली ज्ञानाची पंढरी....’ हे स्वतःचे गीत असणारे राज्यातील एकमेव स्वेरी संस्था आहे.’ असे सांगून ॲड. शिंदे यांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांमधील शिस्तीचा गौरव केला.
३. यावेळी इंजिनिअरिंग व फार्मसीच्या डिप्लोमा व डिग्री मधील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा बाबत सविस्तर प्रश्न विचारले असता डॉ. ओंबासे यांनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली.

0 Comments