प्रतिनिधी : जलसंधारण व जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे सीना–माढा उपसा सिंचन योजना तसेच खैराव–मानेगाव उपसा सिंचन योजना संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत माढा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सिंचनाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सीना–माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगाव (खे.), कुर्डू, अंबाड व पिंपळखुटे या सात गावांचा समावेश करणे, सुमारे २० वर्षे जुन्या झालेल्या मोटारींच्या जागी नवीन मोटारी बसविणे, सीना नदीच्या बोगद्यात नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडणे, खैराव–मानेगाव उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करणे, प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीवरील फळझाडांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचे तातडीने वाटप करणे तसेच नदीकाठावरील विस्कळीत विद्युत व्यवस्था सुरळीत करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.
मा. मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सीना–माढा उपसा सिंचन प्रकल्प व खैराव–मानेगाव उपसा सिंचन योजनेची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
माढा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सिंचनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आमदार नारायण पाटील, भारत शिंदे, अमोल गायकवाड, विजय भगत, शरद मोरे, प्रकाश चोपडे, राजाभाऊ भांगिरे, संजय भोंगे, राजु भानवासे, गणेश गुंडगिरे, बंडु घाडगे, अजिंक्य काटकर, बालाजी टोणपे, रामकृष्ण चोपडे, बाळासाहेब चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments