LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पं. शौनक अभिषेकी आणि अभेद अभिषेकी यांच्या स्वराभिषेकाने विठुरायाच्या चरणी गायनसेवा समर्पितचैतन्य देशपांडे यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध



पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवातील पाचव्या स्वरमाळेत उदयोन्मुख गायक चैतन्य देशपांडे यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले, तर पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र व शिष्य पं. शौनक अभिषेकी आणि अभेद अभिषेकी यांनी शास्त्रीय संगीत, अभंग व नाट्यगीतांच्या सादरीकरणातून विठुरायाच्या चरणी गायनसेवा समर्पित केली. कार्यक्रमाची सुरुवात व्यवस्थापक प्रवीणकुमार घम व मान्यवर कलाकारांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सर्व कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पहिल्या सत्रात चैतन्य देशपांडे यांनी राग पुरीया कल्याण सादर केला. त्यानंतर ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘नाम घेऊ नाम गाऊ’, ‘चिंचेच्या पानावर’, ‘मना लागलिया छंद’ आणि ‘जय दुर्गे दुर्गती परिहारिणी’ या रचनांसह ‘विठ्ठल विठ्ठल गजरी’ या भैरवीने त्यांनी गायनाची सांगता केली. दुसऱ्या सत्रात पं. शौनक अभिषेकी आणि अभेद अभिषेकी यांनी राग झिंझोटी सादर करून रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली. ‘पंढरीचे सुख चंद्रभागे तटी’, ‘हे सुरांनो चंद्रमा’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ आणि ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’ यांसारख्या लोकप्रिय रचनांनी मैफलीत रंग भरला. हार्मोनियमवर उदय कुलकर्णी, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, तबल्यावर संकेत जोशी आणि टाळावर माऊली पिसे यांनी सुरेल साथसंगत केली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.

महोत्सवाच्या पुढील दोन दिवसांत स्थानिक कलाकार तसेच भरतनाट्यम वर्गातील विद्यार्थ्यांचे सादरीकरण होणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments