पंढरपूर, दि.11 (उमाका) :-स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी पंढरपूर तालुक्यातील 69 गावांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. गावांत कायमस्वरुपी स्वच्छता रहावी यासाठी या उपक्रमात प्रत्येक गावांनी तसेच गावांतील वाड्या वस्त्यांनी सहभाग घ्यावा असे, आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनबाबत शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस माजी आमदार प्रशांत परिचारक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमृत सरडे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, पाणी पुरवठा उपअभियंता श्री.पांडव, बांधकाम उपअभियंता श्री.लवटे, ग्रामसेवक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद भुजबळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,तसेच तालुक्यातील ग्रामपंचसयतीचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्यशासनाकडून निधी मिळणार आहे. या प्रकल्पातंर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन होणार असून, गावांत स्वच्छता राहिल तसेच गावांत कोणतीही रोगराई पसरणार नाही. तसेच या प्रकल्पातंर्गत करण्यात येणारी कामे संबधित यंत्रणेने दर्जेदार करावीत असेही श्री. आवताडे यांनी यावेळी सांगितले.
सांडपाणी व्यवस्थापनातंर्गत करण्यात आलेल्या प्रकल्पातील पाण्याचा शुध्देबाबत संबधित गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांनी वेळोवेळी दक्षता घ्यावी. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावांतील पिण्याच्या पाईप लाईन, बंदिस्त गटारी आदी सुविधांचा नकाशा तयार करावा. जेणेकरुन गावात इतर नवे उपक्रम राबविवताना कोणतही अडचण येणार नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने ओला कचरा, सुका कचरा व प्लॅस्टीक वेगळे करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी व्यवस्थानातंर्गत तालुक्यातील सर्वच गावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन तो मान्यतेसाठी घनकचरा व्यवस्थपनातंर्गत गावांत सार्वजनिक कंपोष्ट खत निर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉय सायकल वापरुन कचरा गोळा करणे , ग्रामस्तरावर प्लॅस्टीक संकलन केंद्र तयार करणे तसेच गोवर्धन प्रकल्पातंर्गत गावातील कचरा एकत्रित करुन बायोगॅस वीज निर्मिती करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी दिली.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी पंढरपूर तालुक्यातील एकूण 69 गावांचा आराखड्यात समावेश करण्यात आला असून, 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांना घनकचरा व्यवस्थापन साठी प्रतिव्यक्ती 60 रुपये व सांडपाणी व्यवस्थापन साठी प्रतिव्यक्ती 280रुपये तर 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावासाठी घनकचरा व्यवस्थापन साठी प्रतिव्यक्ती 45 रुपये व सांडपाणी व्यवस्थापन साठी प्रतिव्यक्ती 660 रुपये इतकी रक्कम प्रकल्पासाठी मंजूर होणार आहे. या रकमेपैकी 70 टक्के हिस्सा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त होणार आहे. तर 30 टक्के हिस्सा तरतूद ग्रामपंचायतीनी 15 वा वित्त आयोग निधीतून करायची आहे. सदर प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, प्राप्त प्रकल्प अहवालांना प्रशासकीय मान्यता देऊन निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.
0 Comments