उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे आवाहन
पंढरपूर (दि.14):- वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, चंद्रभागा नदीवर असणाऱ्या पंढपूरातील सर्व घाटांवर पाणी आले असल्याने, भाविकांनी , नागरिकांनी चंद्रभागा नदी पात्रात जावू नये. नागरिकांच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थानातंर्गत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व घाटांवर बॅरेकेटींगही करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत, येणारे भाविक चंद्रभागा नदीत स्नानासाठी व नौकाविहार करण्यासाठी जातात. चंद्रभागा नदीपात्राची पाणी पातळीत वाढ होत असल्याने तसेच नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, भाविकांनी व नागरिकांनी सुरक्षेसाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले महिलेचे प्राण
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावरुन आज दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान भारती चव्हाण (वय-70) या महिलेने वाहत्या प्रवाहात उडी मारली. सदर महिलेस आपत्कालीन पथकाने अत्यंत शिताफीने नदीमधून सुखरूपपणे वाचवले. या महिलेस उपचराकरीता उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर येथे पाठवण्यात आले असून, महिलेची प्रकृती स्थीर असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली .
वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, आज दुपारी 4.00 वाजेपर्यत वीर धरणातून नीरा नदी पात्रात 33 हजार 659 क्युसेक्स तर उजनीतून 61 हजार 600 क्सुसेक भीमा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या पंढरपूर मध्ये भीमा नदीपात्रात 68 हजार 934 क्युसेकने पाणी वाहात आहे.
0 Comments