‘यु ग्रुप्स व स्वेरी’ यांच्यात सामंजस्य करार
पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुढे नोकरीबरोबरच उद्योग धंद्यामध्ये करिअर करावे. उद्योग- व्यवसाय करण्यासाठी बुद्धीची जोड द्यावी लागते. अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून बौद्धिक उर्जा अधिक प्रमाणात मिळते. व्यावसायिक पार्श्वभूमीवर अभियांत्रिकीचे शिक्षण हे सर्वात सरस असून या ज्ञानाचा व्यवहारात विशेष उपयोग होतो. नोकरी व उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात अभियांत्रिकी शिक्षणाचा फायदा होतो. अभियांत्रिकी शिक्षणातून अनेक अडचणी सुटू शकतात. यासाठी आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला प्रथम प्राधान्य द्या. करिअर करताना अडचणी आल्यानंतर त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा आणि हे करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये कठोर परिश्रम करा.’ असे प्रतिपादन डॉ.संजीव चित्रे यांनी केले
स्वेरीमध्ये ‘प्रोजेक्ट टू प्रॉडक्ट अँड प्रॉडक्ट टू स्टार्टअप’ या विषयावर अमेरिकेच्या लॉस गॅटोस, कॅलिफोर्निया येथील यु ग्रुप्सचे संचालक डॉ.संजीव चित्रे हे स्वेरी अंतर्गत असलेल्या इंजिनिअरिंग, फार्मसी एमबीए व एमसीए मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ‘विद्यार्थ्यांना या उपक्रमाची का आवश्यकता आहे? हे स्पष्ट करून स्वेरीच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, मिळालेला निधी, महत्वपूर्ण मानांकने, शिक्षणात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, संशोधन विभागाची गरुड झेप याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुर्वेदाचा अभ्यास व बायो वेद उत्पादनांची जगभर प्रसिद्धी होण्यासाठी मोठे कार्य करत असलेल्या डॉ.दीपा चित्रे म्हणाल्या की, 'जगातील उद्योगासमोर आपल्याकडील मुलभूत उत्पादनांचे महत्व पटवून दिले पाहिजे. जोपर्यंत उत्पादनाची गुणवत्ता सिद्ध होत नाही तोपर्यंत जनतेचा विश्वास त्या उत्पादनावर बसत नाही. आपल्या उत्पादनाची क्षमता वाढवली पाहिजे. तरुणांनी पुढे येऊन धाडसाने आपली गुणवत्ता दाखवण्याची गरज आहे. उद्योग क्षेत्रामध्ये तरुणांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे गरजेचे आहे.' पुढे मार्गदर्शन करताना डॉ.संजीव चित्रे म्हणाले की, ‘भारतातून अमेरिकेत गेल्यानंतर माणसाचा रोजच्या जीवनात लागणाऱ्या अनेक गोष्टींच्या उत्पादनाचा मी अभ्यास केला. त्या अनुषंगाने माणसे गोळा करून नवी उत्पादने व बाजारपेठा निर्माण केल्या. उद्योजक म्हणून कार्यरत राहण्यासाठी अचूक निरीक्षण,संयम व ज्ञान मिळवण्याची कृती विकसित करणे गरजेचे आहे.’ असे सांगून त्यांनी यशस्वी उद्योजकांची उदाहरणे दिली. यावेळी ‘इंजिनिअरिंग व फार्मसी मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व त्यातून उद्योजकतेला चालना देणे यासाठी यु ग्रुप्स व स्वेरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी पार्थ पॅक्वेलचे संचालक व सीए अजय अधिकारी, सौ. नेहा अधिकारी, वास्तुतज्ञ प्रदीप वढावकर, सौ. मीना वढावकर तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह इंजिनिअरिंग व फार्मसीचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी आभार मानले.
0 Comments