पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरामध्ये आजपासून बेमुदत संपाला सुरुवात झालेली आहे. पंढरपूर तालुक्यांमध्ये विविध कर्मचारी संघटना एकवटल्या असून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी एकमुखी मागणी आज माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांचे मार्फत पाठवण्यात आले.
पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासह विविध संवर्गातील कर्मचारी - अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी म्हणजेच पेन्शन त्यांना प्रदान करण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र असून शासनाने याबाबत लवकरात निर्णय घ्यावा.
एक नोव्हेंबर 2005 पासून शासन सेवेत आलेल्या व काही कारणास्तव मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची अत्यंत दयनीय अवस्था सध्या पहावयास मिळत आहे. तसेच सेवानिवृत्तीनंतर आपले काय अशा प्रकारची भीती कर्मचाऱ्यांना सतावू लागलेली आहे. सध्या सुरू असलेली NPS योजना ही पूर्णपणे शेअर मार्केट वर आधारलेली असल्यामुळे यामध्ये कोणतीही शाश्वती नाही.या योजनेमुळे रिटायर झाल्यानंतर अवघे 1500 ते 1800 रू. पेन्शन मिळू लागते आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. म्हणून 1982-84 निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ववत सुरू करावी . देशातील झारखंड, छत्तीसगड, हिमाचल, पंजाब , राजस्थान अशा विविध राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेले आहेत. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य असल्यामुळे महाराष्ट्रात याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे.
शासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन यावर होणाऱ्या खर्चाची आकडेवारी ही दिशाभूल करणारी आहे. खरे पाहता वेतनावर 24% व पेन्शन वर टक्के खर्च होत आहे परंतु ही आभासी रक्कम दाखवून मीडिया मधून वेगळी चर्चा घडवून आणली जात आहे. एकीकडे आमदार व खासदार यांची पेन्शन दोन मिनिटांत सभागृहात कोणत्याही चर्चेविना वाढवली जाते व कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये वेळकाढूपणा दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे हा फक्त आर्थिक विषय नसून तो एक सामाजिक विषय बनला आहे त्यामुळे याबाबत शासनाने विनाविलंब निर्णय घ्यावा व संप मिटवावा.
याप्रसंगी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजितआबा पाटील, पंढरपूर मंगळवेढा राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे, जुनी पेन्शन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे, तालुकाध्यक्ष रियाज मुलानी यांनी आपल्या मनोगतामधून संपाची दाहकता व जुनी पेन्शनची आवश्यकता याबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी शिक्षक नेते उत्तमराव जमदाडे, जोतीराम बॉगे, रामभाऊ यादव, दत्तात्रय येडगे, सुनील कोरे, बापूसाहेब मिसाळ, संजय हेगडे, सुभाष भोसले, प्रशांत वाघमारे, जिल्हा नेते बाबासाहेब घोडके, जिल्हा उपाध्यक्ष विजय राऊत, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष नमिता शिर्के, तालुका आघाडी प्रमुख कांचन गोरे, संस्थापक अध्यक्ष संदीप खेडकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे सर्व प्रमुख नेते, असंख्य महिला व पेन्शन फायटर तसेच पाठिंबा देण्यासाठी पेन्शन लागू असणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार माध्यमिक विभाग प्रमुख भारत पाटील यांनी मानले.


0 Comments