पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीसाठी येत्या शुक्रवारपासून (ता.15 मार्च) विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांना दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या काम वेगाने सुरू झाले आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे मंदिर समितीने येत्या 15 मार्चपासून सुमारे दीड महिना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना देवाचे केवळ मुख दर्शन घेता येईल. या कामाच्या काळात देवाच्या मूर्तीला काचेचे आवरण केले जाणार आहे.
मंदिरामध्ये सर्व नित्योपचार सुरू राहणार आहेत. या काळात सकाळी पाच ते 11 पर्यंत भाविकांना मुख दर्शन घेता येईल असेही मंदिर समितीने स्पष्ट केले.
0 Comments