पंढरपूर (ता.30):- चैत्र शुध्द 1 हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे नवीन वर्षारंभाचा दिवस आहे. नवीन वर्षानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस नवीन महावस्त्रे परिधान करण्यात आली. मंदिरात सकाळी 8.00 वाजता मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते ध्वज पुजन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, श्री संत नामदेव पायरीवरील (महाद्वारावरील) गोपूर, श्री रुक्मिणी उत्तरद्वार गोपुर, या ठिकाणी विधिवत पूजा करून ध्वज लावण्यात आले. सकाळी पंचांग पूजन करण्यात आले. मंदिर समितीचे पुजारी वेद शास्त्र संपन्न समीर कौलगी यांनी पंचांग वाचन केले. या दिवसापासून श्रीं चे महानैवेद्यामध्ये श्रीखंड वापरण्यास सुरवात करण्यात येत असून, दुपारी पोशाखावेळी श्रींस अलंकार परिधान करण्यात येणार आहेत.
*अन्नछत्रात वर्धापन दिनांनिमित्त विशेष भोजन प्रसाद*
हिंदू धर्मात अन्नदानाचे महत्व अनन्य साधारण आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे.
मंदिर समितीचे श्री संत तुकाराम भवन येथे विनामूल्य अन्नछत्र सुरू असून, या अन्नछत्राचा सन 1996 पासून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला आहे. आज अन्नछत्राचा वर्धापन दिन असल्याने विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नछत्रामध्ये दु.12.00 ते 2.00 व रा.7.00 ते 9.00 या वेळेत मोफत पोटभर भोजनप्रसाद भाविकांना उपलब्ध करून देतो, त्याचा दैनंदिन 2500 ते 3000 भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आज वर्धापन दिनांनिमित्त मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते पुजा करून भाविकांना भोजन प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ, सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते. यां अन्नछत्रामध्ये अन्नदान करण्यासाठी विविध योजना असून इच्छुक भाविकांना कार्यालयात संपर्क करून अधिक माहिती जाणून घेता येईल.
0 Comments