दि. २३ एप्रिल हा 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. २३ एप्रिल या दिवशी अनेक लेखकांचा जन्म किंवा मृत्यू झालेला असून त्यांच्या स्मरणार्थ हा 'जागतिक पुस्तक दिन' साजरा करण्यात येतो. यामध्ये विल्यम शेक्सपियर, इंका गसिॅलोसा या महान लेखकांचा मृत्यू आहे. हे सर्व जागतिक महान असे लेखनाचे कार्य केलेले लेखक आहेत म्हणून यांच्या स्मरणार्थ २३ एप्रिल हा ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १९९५ पासून ‘पुस्तक दिन’ साजरा सुरुवात झाली. युनेस्कोने २३ एप्रिल ‘जागतिक पुस्तक दिन’ तसेच ‘कॉपीराईट दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. युनोस्कोने एकासभेमध्ये हा निर्णय घेतला. जगभरातील लेखकांचा सन्मान देण्याचा हा यामागचा उद्देश आहे. यातून लेखक, वाचक, प्रकाशक आणि कॉपीराईटला प्रोत्साहन मिळते. दरवर्षी वेगवेगळी थीम असते. यावेळी मात्र 'रीड युवर वे २०२५' ही थीम ठरवली आहे.
परंतु आज मोबाईल युगात वाचन संस्कृती ही हरपत चालली आहे की काय अशी मनामध्ये भीती वाटत आहे. गेल्या दहा वर्षापासून ग्रंथालय क्षेत्राशी निगडित मी असून मुलांची पुस्तके किंवा वाचक वर्गाला पुस्तकांकडे येण्याचा कल हळूहळू कमी होऊ लागला आहे असे प्रकर्षाने दिसून येत आहे. वाचन संस्कृती टिकण्यासाठी अनेक प्रयत्न देखील सर्व स्तरातून चालू आहेत. पुस्तके हे एक चांगले मित्र असतात. आपले उज्वल भविष्य ते घडवत असतात. म्हणून ‘पुस्तक वाचणे ही काळाची गरज’ आहे. आज इंटरनेटच्या जमान्यामध्ये ‘चाट जीपीटी’ सारख्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती नेटवरून काही सेकंदात मिळते. परंतु इत्यंभूत माहिती जर पाहिजे असेल किंवा सखोल अभ्यास करायचा असेल तर आपल्याला पुस्तकाशिवाय पर्याय नाही. म्हणून महापुरुषांनी म्हटले आहे 'वाचाल तर वाचाल' आज तासनतास मोबाईल, कॉम्प्युटर यांसारख्या गोष्टीकडे आपण वेळ घालवत आहोत परंतु मुलांवर ‘आदर्श संस्कार’ घडवणारे पुस्तके मात्र आपण वाचण्याकडे दुर्लक्ष करत आहोत. हे आपणास दिसून येते. मोबाईल, संगणक यावर जास्त वेळ बसल्यामुळे आपल्याला ताण, लठ्ठपणा व चिडचिडपणा, डोळ्यांना त्रास, विविध आजार यांसारख्या गोष्टी होत असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आपण खेळाकडे व वाचनाकडे दुर्लक्ष करत आहोत हे दिसून येते. पुस्तक हे माणसाचे आयुष्य उज्वल करत असतात. त्याचे भविष्य ठरवत असतात.
अजून एक गोष्ट लक्षात येते की, अलीकडच्या काळामध्ये दर्जेदार पुस्तके हे प्रकाशित होत नाहीत किंवा लेखकांच्या लेखणीमध्ये पूर्वींच्या लेखकांच्या तुलनेने शब्दाची रचना दिसून येत नाही. ज्याने वाचक वर्ग आपल्याकडे आकर्षित होईल. जुने काही पुस्तके ग्रंथ आज कितीही वेळा वाचले तर ते पुन्हा पुन्हा वाचू वाटतात. त्या तुलनेने त्या तोला-मोलाचे ग्रंथ आज प्रकाशित होणे गरजेचे वाटू लागले आहे. म्हणजे पुस्तकांकडे वाचक वर्ग आकर्षित होईल.
'गाव तिथे ग्रंथालय' हा उपक्रम शासनाने राबवलेला आहे. परंतु तुटपुंजे मानधन व वाचकवर्गांना सेवा देण्यात येणारे अनेक अडथळे यामुळे असे उपक्रम असूनही वाचक ग्रंथालयापासून दूर जात आहेत. आज 'आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन' या निमित्ताने अनेक ठिकाणी वाचन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे वाचकांची संख्या व आपल्याकडे कोणते ग्रंथ आहेत, हे समजण्यास मदत होत आहे. ग्रंथालय क्षेत्रात सुद्धा ऑनलाइन ग्रंथ आज अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेक वेबसाईट ऑनलाइन ग्रंथ पुस्तके देवघेव करत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. आज ई-जर्नल्स, ई-सेवा देण्यासाठी काही ग्रंथालये सज्ज आहेत. त्यामुळे वाचकांचा व सेवकांचा वेळ वाचत आहे व यातून हवी ती माहिती आपल्या ग्रंथालयातून सर्वांना त्वरित प्राप्त होत आहे. त्यामुळे वाचकांचे समाधान होत आहे हे दिखील दिसून येते. जर उदाहरण पहायला गेले तर माझ्या मते स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ग्रंथालय सुसज्ज, भरपूर ग्रंथसाठा तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी २४ तास ग्रंथालय सेवा देत आहेत. यामुळे वाचक वर्ग साहजिकच वाढत असल्याचे दिसून येते. स्वेरीत अभ्यासाव्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकासावर अनेक संदर्भ ग्रंथ आहेत. या व अशा ग्रंथालयांची सध्या सर्वत्र गरज आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. आपले उज्वल भविष्य घडवायचे असेल व मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर पुस्तके वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून 'वाचाल तर वाचाल' हे वाक्य सार्थ ठरते.
-सुहास श्रीकांत कुलकर्णी, माळखांबी ता. माळशिरस, जि. सोलापूर. मोबाईल-७७५६०९६९७५
0 Comments