पंढरपूर,ता.29ः मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वतःच्या शेतातील चार एकरावरील सुमारे दीडशे टन मक्याचा हिरवा चारा तोडून त्यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी मोफत दिला आहे. श्री.धोत्रे यांनी मुक्या जनावरांप्रती दाखवलेल्या दातृत्वाचे पशुपालकांमधून स्वागत केले जात आहे. सोमवारी (ता.29) दुपारी माढा येथे आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गरजू शेतकर्यांच्या जनावरांसाठी चार्याचे वाटप करण्यात आले.
सीना नदीला महापूर आला आहे. यामध्ये माढा तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांसह चारा पिके पूरात वाहून गेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्यांचे पशुधन संकटात आले आहे. मागील आठ दिवसांपासून या भागात चार्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हीच गरज ओळखून मनसेेचे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वतःच्या शेतातील चार एकरावरील मक्याचा चारा तोडून तो स्वखर्चाने माढा तालुक्यातील विविध गावात पोच केला आहे. पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी त्यांचे वाटप ही करण्यात आले आहे. येथील शेतकर्यांकडून जनावरांसाठी हिरव्या चार्याची मागणी होती. मक्याचा हिरवा चारा मिळाल्याने येथील पूरग्रस्त शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
श्री. धोत्रे यांनी दोन दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील पूरग्रस्तभागाचा दौरा केला होता. त्यावेळी येथील जनावरांना हिरव्या चार्याची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या करकंब येथील चार एकर क्षेत्रावरील मक्याचा चार पूरग्रस्त शेतकर्यांच्या जनावरांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी आवश्यक त्या ठिकाणी जनावरांसाठी हिरव्या चार्याचे वाटप करण्यात आले. योग्यवेळी हिरवा चारा उपलब्ध झाल्याने पूरग्रस्त शेतकर्याचे श्री. धोत्रे यांचे आभार देखील यानिमित्ताने व्यक्त केले.
यापूर्वी धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांना व घरांची पडझड झालेल्या कुटुंबियांना दहा हजार रुपयांची रोख स्वरुपात आर्थिक मदत दिली आहे. त्यानंतर आता त्यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सुमारे दीडशे टन ओल्याची चार्याची सोय केली आहे. दसरा दिवाळी सणाच्या निमित्ताने पूरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट देण्यात येईल असेही यावेळी श्री.धोत्रे यांनी सांगितले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार,संजय गायकवाड, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे आदी उपस्थित होते.
------------

0 Comments