पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या घरकुल जलजीवन आणि अहिल्यादेवी सिंचन विहीर या संदर्भातील अडीअडचणी सोडवण्यासाठी बुधवारी पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन येथे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
आढावा बैठकीच्या सुरुवातीला आमदार समाधान आवताडे यांनी घरकुल, अहिल्यादेवी सिंचन विहिरी आणि जल जीवन योजनेचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटशिक्षणाधिकारी सुशील संसारे उपस्थित होते.
या बैठकीसाठी मोठ्या संख्येने पंढरपूर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीदरम्यान पंढरपूर मतदार संघातील नागरिकांनी आमदार आवताडे यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन आमदार आवताडे यांनी संबंधित अधिकारी आणि तक्रारदार नागरिक गावातील सरपंच यांना समोरासमोर बोलावून लवकरात लवकर तोडगा काढून प्रश्न सोडवण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने राज्यातील नागरिकांसाठी शासनाच्या घरकुल आणि अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजना नागरिकांपर्यंत विनाअडथळा पोहोचवाव्यात मतदार संघातील काही गावामध्ये विहिरीच्या लाभार्थी अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थी वाढविण्यासाठी सूचना दिल्या यासाठी आढावा बैठकीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढून प्रश्न सुटावेत यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की शेततळ्यासाठी जादा अनुदान मिळावे यासाठी सभागृहात कृषिमंत्र्याकडे पाठपुरावा करायला असल्याचे सांगितले.
तसेच मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना विहीर मंजूर करण्यात यावी. याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत होणारी कामे दर्जेदार पद्धतीचे करून घ्यावीत. जलजीवन कामाच्या योजनेत उदासीनता असल्याने खंत व्यक्त करत यांनी कामे पूर्ण झाल्याशिवाय बिल देऊ नयेत. झालेल्या कामाचा दर्जा तपासावा अशा सूचना केल्या. मतदार संघातील ज्या लोकांच्या जल जीवन योजनेबाबत तक्रारी आहेत अशा नागरिकांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात अर्ज द्यावेत त्यावरती मी लवकरच कार्यकारी अभियंता सह संबंधित सर्व अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत बैठक घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे एकही घरकुल रद्द करू नये. जागेची समस्या असल्यास त्यावर योग्य तोडगा काढून गायरान, गावठाण यामध्ये जागा घरकुलासाठी उपलब्ध करून द्यावी. जागेसाठी शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत घेऊन घरकुल पूर्ण करावे. घरकुल बांधकामासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी मोफत वाळू माती मिश्रित न देता चांगल्या पद्धतीची द्यावी. घरकुल योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना देण्यात यावा. यावेळी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या जागेच्या अडचणी बाबत प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे बसून अडचणी दूर करून यातील एक ही घरकुल माघारी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी अपेक्षा व्यक्त करत शासनाच्या घरकुल, जलजीवन, अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना नागरीकांपर्यंत विनाअडथळा पोहोचवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनेतून होणारी कामे दर्जेदार पद्धतीने करून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी नागरिकांनी समस्या जाणून घेतल्याबद्दल आमदार आवताडे यांचे आभार मानले..
0 Comments