भविष्यातील अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करण्यासाठी योग्य डिझाइन आवश्यक आहे. यामुळे सॉफ्टवेअर जलद आणि प्रभावीपणे काम करते. सध्याच्या काळातील सॉफ्टवेअर व वेब डिझाईन ची वाढती मागणी पाहता न्यु सातारा महाविद्यालय व बाईट ब्रिलियंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पंढरपूर यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या करारानुसार विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, कौशल्यविकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून या करारामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील व शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक अनुभव मिळाल्याने विद्यार्थी अधिक सक्षम व स्पर्धात्मक होतील असे सांगण्यात आले . तसेच पुढे बोलताना प्राचार्य लोंढे म्हणाले की, हे प्रशिक्षण कॉम्प्युटर इंजीनियरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागातील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे इन प्लांट ट्रेनिंग सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भविष्यामध्ये नोकरी व व्यवसायामध्ये फार मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तर कंपनीचे सीईओ व फाउंडर मा. दिगंबर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना उद्योग व शिक्षण यांच्यातील दुवा अधिक घट्ट करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांच्या मार्गदर्शनातून हा करार करण्यात आला. हा करार करतेवेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सागर राउळ व प्राध्यापिका संजीवनी राऊत मॅडम यांनी केले.

0 Comments