LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या काळजीपूर्वक वापराबाबत जनजागृती आवश्यक -कार्यकारी अभियंता राजेश वायदंडेस्वेरीत ‘विद्युत सुरक्षा जागरूकता आणि खबरदारीचे उपाय’ हे सत्र संपन्न


पंढरपूर- ‘सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विजेचा वापर जर हलगर्जीने केला तर आपण भरून न येणाऱ्या नुकसानीस सामोरे जावू शकतो यासाठी विजेचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा. यासाठी सर्वोत्तम दर्जाची इलेक्ट्रिकल साधने, चांगल्या क्षमतेची अर्थिंग, वेळोवेळी इलेक्ट्रिकल साहित्यांची देखभाल या बाबी महत्त्वाच्या ठरतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असताना सर्वप्रथम विजेचा वापर काळजीपूर्वक पणे करण्यासाठी आपल्याबरोबरच समाजात देखील जनजागृती करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन सांगली विभागातील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश वायदंडे यांनी केले. 
        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांकरिता ‘विद्युत सुरक्षा जागरूकता आणि खबरदारीचे उपाय’ या विषयावर आयोजिलेल्या सत्रात अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश वायदंडे हे विद्यार्थ्यांना विद्युत विभागाच्या संदर्भात जनजागृती, काळजी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती देत होते. स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी)च्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.चित्रसेन मैतई यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागात या सत्राचे आयोजन केले होते. प्रास्ताविकात प्रा. व्ही.ए. सावंत यांनी विद्यार्थ्यांना ‘विद्युत सुरक्षा जागरूकता आणि खबरदारीचे उपाय’ याची का आवश्यकता आहे हे सांगून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. पुढे बोलताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश वायदंडे म्हणाले की, ‘अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच आता वीज ही देखील आवश्यक घटक झाली आहे. विद्युत उपकरणे वापरताना काळजी घ्यावी कारण यात माफी, क्षमा नसते, त्याचा परिणाम जाणवतो. याचबरोबर घरामध्ये योग्य क्षमतेच्या आरसीबी, ईएलसीबी चा वापर करावा व अर्थिंग चांगल्या क्षमतेची करून घ्यावी आणि याची नियमित तपासणी करावी. कृषी अवजारे, बटन, प्लग, वायर असे इलेक्ट्रिकल साहीत्य आयएसआय प्रमाणित असावे. वीज जोडणी करताना साहित्यात काटकसर, हलगर्जीपणा न करता सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजीपूर्वक जोडणी करावी. आपल्या घराचे बांधकाम विद्युत वाहिनी पासून सुरक्षित अंतरावर करावे, तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह आणून सोडल्याने अपघात घडतात, तसेच विद्यूत वाहिनीच्या जवळ असणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, शेवग्याच्या शेंगा काढणे, उंच झाडावर असणारे आंबे, चिंच, नारळ काढणे या सर्व बाबी महावितरणच्या कार्यालयाला माहिती देऊन आणि कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून वीज बंद झाल्याची खात्री केल्यानंतरच सदरची कामे करावी. शेती पंपाची मोटर बंद पडल्यास स्वतः ती दुरुस्त न करता मान्यता प्राप्त ठेकेदाराकडून ते काम करावे. विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी करणे हेही एक अपघाताचे कारण आहे. शेतातून विजेच्या तारा गेल्या असल्यास त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. घरामध्ये फ्लेक्झिबल वायरचा वापर केल्याने पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरतो व घरामध्ये असणाऱ्या मुव्हेबल मोटरचे कनेक्शन जोडत असताना मेल फिमेल कॉन्टॅक्ट चुकीच्या पद्धतीने जोडल्याने खूप मोठ्या प्रमाणात अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. अडकलेले पतंग काढताना विद्यूत वाहिनीमुळे अपघात घडलेले आहेत. शेतामधील तार तुटून पडल्यास तुटलेल्या तारामध्ये विद्युत प्रवाह असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्या तारांना स्पर्श न करणे किंवा त्या तारा हाताने बाजूला  करण्याचा प्रयत्न न करणे हे योग्य आहे. महावितरणच्या पोलला ॲडव्हर्टायझिंग बोर्ड, होर्डिंग, बॅनर लावणे, महावितरणच्या पोल वरून टीव्हीचे केबलचे कनेक्शन नेणे, या गोष्टी टाळाव्यात. महावितरणच्या कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चरची कामे अधिकृत व्यक्तीकडूनच करावी. घरामध्ये चांगल्या दर्जाच्या थ्री पिनचा वापर करावा. जोड असलेल्या फ्लेक्झिबल वायर वापरू नये. विद्युतभारीत वाहिनी पासून लोखंडी वस्तू नेत असताना उंचीचे भान ठेवावे. विद्युत वाहिनीच्या खाली ज्वलनशील पदार्थांची साठवणूक करू नये. विद्युत वाहिनीच्या खांबांना व ताणतारेला शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस आदी जनावरे बांधणे टाळावेत.’ असे सांगून अभियंता वायदंडे यांनी अपघात होण्याची कारणे व त्यापासून घ्यायची काळजी याबाबत सांगून राज्यातील वीज अपघाताची आकडेवारी सादर केली तसेच सण, उत्सव, शेतीपंप, घर, दुकाने, औद्योगिक वसाहत, कारखाने, शेतातील, विजेचे पोल, चुकीची वीजजोडणी अशा ठिकाणी घडणारे अपघात हे हलगर्जीने घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी अभियंता वायदंडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून उत्तम दर्जाचे वायरिंग, चांगल्या दर्जाची उपकरणे, वेळोवेळी तपासणी, वीज वापराच्या संदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भात घडलेल्या घटनांच्या छायाचित्रांचा वापर करून पटवून दिले. यावेळी घरगुती वीज व त्याच्यापासून सुरक्षेसंबंधी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले असता अभियंता राजेश वायदंडे यांनी त्यांच्या शंकांचे समाधान केले. तसेच वीजेपासून होणाऱ्या अपघातापासून सुरक्षा व घ्यायची काळजी यासंदर्भात पोस्टर्स वाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोलापूर शहर महावितरणचे डेप्युटी ऑपरेटर बी. एम. नारायणकर व स्वेरीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रा. डी.डी. डफळे, प्रा. एस.एम. घोडके, प्रा.वाय. आर. नागटीळक, प्रा. एस.एस. कवडे, प्रा.एस.एस. चौगुले यांच्यासह डिग्री व डिप्लोमा महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक वर्ग व जवळपास ५०० विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments