पंढरपूर, दि. १८ : सामाजिक, आध्यात्मिक व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘राजा शिवछत्रपती समाजभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राजा शिवछत्रपती सामाजिक संस्था, सातारा यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
मोरे महाराज यांनी ‘निर्मल वारी’ व ‘हरित वारी’ या अभियानांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता जनजागृती, वृक्षारोपण तसेच समाजप्रबोधनाचे व्यापक कार्य उभारले आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांनी समाजात पर्यावरणाबाबत सकारात्मक जागृती निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याचा महाराष्ट्रासह देशातील अनेक संस्थांकडून गौरव करण्यात आला आहे.
पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल मोरे महाराज यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये “सालूमर्दा थिमक्का नॅशनल ग्रीनरी अवॉर्ड २०१८-१९”, “पर्यावरण गौरव पुरस्कार २०१८”, “ऋषी पुरस्कार २०२२”, “वृक्षसेवा पुरस्कार २०२३”, “हिंदू शौर्य पुरस्कार २०२४” तसेच “किर्लोस्कर वसुंधरा सन्मान २०२५” यांचा समावेश आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सुमारे २५ ते ३० पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मोरे महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान अकरावे वंशज असून त्यांनी देहू येथील संस्थांन मध्ये नऊ वर्ष मुख्य विश्वस्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना विश्रांती मिळावी या उद्देशातून मंदिर समिती, सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर, महाराष्ट्र शासन तसेच लोकसहभागातून श्रीक्षेत्र मंगळवेढा ते श्रीक्षेत्र पंढरपूर या २३ किलोमीटर पालखी महामार्गावर सन २०१८ मध्ये लोखंडी ट्रिगार्डसह ९२०० देशी वृक्ष (वड, पिंपळ, कडूलिंब, चिंच) लावण्यात आले. या वृक्षांचे संवर्धनही मंदिर समितीकडून सातत्याने करण्यात येत असून हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आलेला ‘राजा शिवछत्रपती समाजभूषण’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
*चौकट*
“मोरे महाराज यांनी ‘निर्मल वारी’ व ‘हरित वारी’ यांसारख्या अभियानांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, समाजप्रबोधन व आध्यात्मिक कार्याचा प्रभावी संगम घडवून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा ‘राजा शिवछत्रपती समाजभूषण’ पुरस्काराने झालेला सन्मान ही अभिमानास्पद बाब आहे.” त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा....!
— गहिनीनाथ महाराज औसेकर,
सह-अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर.

0 Comments