मोहोळ : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील सिद्धेवाडी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांकडून निवेदने स्वीकारून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मोहन माने यांनी विविध मागण्यांचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे सादर केले.
यामध्ये आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा-३ अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करणे, माढा–सिद्धेवाडी रस्त्याचे डांबरीकरण, सिद्धेश्वर देवस्थानासमोर सभा मंडप उभारणे, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करणे, एस.टी. बसचा गावात मुक्काम ठेवणे तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न सोडविणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून काही समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, गावकऱ्यांनी कोणत्याही समस्येसाठी माझ्याशी थेट संपर्क साधावा. सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करेन.
या ग्रामभेटीप्रसंगी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश आप्पा पवार, सरपंच मोहन माने, जगन्नाथ माने, साहेबराव निकम, अजय यादव, भाऊसाहेब माने, दाजी मोहिते, सुनील खडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments