LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदनसह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल; मंदिर दर्शनासाठी नियमित खुले राहणार



पंढरपूर, दि. २२ : श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमाता यांच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरातत्त्व तज्ज्ञ, संबंधित अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, सल्लागार परिषद सदस्य व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

तज्ज्ञांनी दिलेल्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार दिनांक २२ ते २४ जून या कालावधीत मूर्ती संवर्धनाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान आवश्यक तांत्रिक कामकाज सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडता यावे यासाठी दिनांक २३ व २४ जून रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सदर मूर्ती संवर्धन प्रक्रियेसंदर्भात मे. दिवाणी न्यायालय, पंढरपूर येथे दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मा. न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश पारित केला आहे. मे न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून प्रस्तावित संवर्धनाची कार्यवाही सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. दरम्यान, मा. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाविरुद्ध संबंधित वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून त्या अपीलवरील सुनावणी दिनांक २३ जून रोजी होणार आहे. वरिष्ठ न्यायालयाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे.

त्यामुळे सद्यस्थितीत दिनांक २३ व २४ जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असून दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू राहील. याची वारकरी, भाविक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments