सोलापूर, दि. 22 (जिमाका) : आषाढी एकादशी महासोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची वाहतूक व्यवस्था सुरक्षित, सुलभ आणि सुविहित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वारीच्या काळात भाविकांची आर्थिक लूट रोखणे तसेच वाहतूक कोंडी टाळणे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
पंढरपूर शहर व परिसरात धावणाऱ्या ऑटो रिक्षांवर संयुक्त धडक मोहीम राबविण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
विनापरवाना वाहतुकीवर कारवाई : वैध चालक परवाना (Driving License) व परमिट नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून संबंधित वाहने जप्त करण्यात येतील.
मनमानी भाडे आकारणी सहन केली जाणार नाही : वारीदरम्यान प्रशासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या किंवा मनमानी पद्धतीने पैसे वसूल करणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात येतील.
नियमबाह्य व जादा प्रवासी वाहतुकीवर दंडात्मक कारवाई : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक (Over-seating) करून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
महत्वाची सूचना :
प्रशासनाने सर्व रिक्षा चालकांना वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा (Insurance) आणि चालक परवाना सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे. तसेच, निश्चित केलेले भाडेपत्रक (Tariff Card) प्रवाशांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे.
प्रवासी व वारकऱ्यांसाठी आवाहन :
प्रवासी व वारकऱ्यांनी कोणत्याही रिक्षा चालकाकडून जादा भाड्याची मागणी झाल्यास किंवा गैरवर्तन झाल्यास तात्काळ परिवहन विभागाच्या मदत कक्षाशी (0217-2303099) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी सर्व रिक्षा चालकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा, कोणतीही गय न करता परवाना रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ही माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*******

0 Comments