पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी दत्तराज नर्सरी येथे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच वनस्पतींचे महत्त्व समजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, शोभेची झाडे तसेच त्यांची लागवड, संवर्धन आणि निगा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. नर्सरीतील तज्ज्ञांनी वृक्षसंवर्धन, जैवविविधता, पर्यावरण संरक्षण आणि प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत या उपक्रमात सहभाग घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री घंटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्येक वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे औषधी व पर्यावरणीय महत्त्व याची प्रत्यक्ष माहिती देत अभ्यासक्रमाशी जोडून शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभवातून शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाबाबतची जबाबदारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.
या क्षेत्रभेटीच्या यशस्वी आयोजनासाठी वर्गशिक्षिका शीतल होनराव, लक्ष्मी बोडके, ऐश्वर्या कुलकर्णी, तृप्ती वाठारकर, श्वेता डोईफोडे, श्वेता ताड आणि सौ. दगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिस्त आणि उपक्रमातील सक्रिय सहभाग यासाठी शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली.
या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सतीशजी पुरंदरे, माजी अध्यक्षा वीणाताई जोशी, सदस्या रेखाताई उंबरकर, सदस्य डॉ. अनिल जोशी, ॲड. ज्ञानेश आराध्ये, सदस्या रेखाताई भालेराव, सदस्य प्रशांत कुलकर्णी, सदस्य डॉ. तेजस भोपटकर आणि सदस्य प्रसाद संत यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना अशा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणातून ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. भविष्यातही अशा शैक्षणिक आणि उपयुक्त उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांसाठी ही क्षेत्रभेट ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली. अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक आनंददायी, अनुभवाधारित आणि परिणामकारक बनत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले.

0 Comments