LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भीमा नदी वाळवंटात स्वच्छता मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलला कचरा**आषाढी वारी २०२६ मध्ये वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्याबरोबरच स्वच्छतेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार*



*पंढरपूर, दिनांक ४ :* आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने यात्रा कालावधीत १२ ते १५ लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात. यातील लाखो भाविक भीमा नदीच्या तीरावर स्नान व दर्शनासाठी येत असतात. मात्र, नदीपात्राच्या दोन्ही बाजूला वाळवंटात कचरा व कचरायुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात पडलेल्या असतात.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीमा नदीच्या वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः वाळवंटातील कचरा उचलून या मोहिमेची सुरुवात केली. त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह महसूल, पोलीस, नगरपरिषद व अन्य विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*भाविकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार* 
आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकरी-भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण मिळावे, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली. चंद्रभागेच्या वाळवंटात प्लास्टिक पिशव्या, निर्माल्य, खाद्यपदार्थांचे अवशेष व इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी नागरिकांना व भाविकांना आवाहन केले की, “पंढरपूर हे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. नदीपात्र व वाळवंट स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासनाच्या वतीने ही नियमितपणे कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. परंतु नागरिक, भाविक यांनी कचरा वाळवंटात नदी तीरावर कुठेही न टाकता कचराकुंडीत टाकावा व प्रशासनाला सहकार्य करावे. यावर्षीच्या वारीतही स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, यात्रा कालावधीत स्वच्छतेबरोबरच सुरक्षिततेवरही विशेष भर दिला जाणार आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी वारी काळात नियमित स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

या मोहिमेमुळे आषाढी वारीपूर्वीच भीमा नदीचे वाळवंट स्वच्छ झाले आहे. तसेच नगरपरिषदेच्या वतीने नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. 
           *******

Post a Comment

0 Comments