LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी तसेच वाडी-वस्तीवरील नागरिकांना विद्युत भारनियमनामुळे होत असलेल्या गैरसोयीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनिल सावंत यांचे निवेदन.


पंढरपूर प्रतिनिधी :
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच वाडी-वस्तीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विद्युत भारनियमन (लोडशेडिंग) करण्यात येत असून, त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आषाढी वारी सोहळ्या निमित्त पाहणी दौऱ्यासाठी पंढरपूर येथे आले असता पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे शिवसेना नेते अनिल सावंत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्वतंत्र सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. मात्र, सध्या थ्री फेजमधून दिला जाणारा सिंगल फेज वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यावर सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत भारनियमन केले जात आहे. त्यामुळे वाडी-वस्तीवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांचा अभ्यास, दैनंदिन घरगुती कामकाज, तसेच जनावरांचे दूध काढणे, चारा व पाण्याची व्यवस्था करणे यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

याशिवाय, शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होत नाही. सध्या पिकांच्या वाढीचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी सुरू असल्यामुळे अनियमित वीजपुरवठ्याचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भारनियमनाचे वेळापत्रक निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी तसेच वाडी-वस्तीवरील नागरिकांना नियमित, अखंड व पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. ग्रामीण भागातील रात्रीचे भारनियमन तातडीने बंद करावे. तसेच थ्री फेजमधून पूर्वीप्रमाणे सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्यात यावा. याचबरोबर भारनियमनाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करून त्याची पूर्वसूचना नागरिकांना देण्याची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे अनिल सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments