पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस),कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉली.), कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) तसेच स्वेरी लॉ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर शहरात वारकरी, भाविक व नागरिकांसाठी विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
पंढरपूर येथे वर्षभरात चार प्रमुख वाऱ्या भरतात. त्यापैकी आषाढी वारी ही सर्वाधिक गर्दीची असून लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. या काळात वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी तसेच स्वच्छता व सामाजिक जनजागृतीसाठी स्वेरी या संस्थेचे विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनास सक्रिय सहकार्य करत आहेत. १९९८ मध्ये संस्थेच्या स्थापनेपासून स्वेरीने वारी काळात सेवा करून सातत्याने योगदान देत एक आदर्श परंपरा जपली आहे. यावर्षी २२ जुलै ते दि.३० जुलै २०२६ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध सेवा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये 'तीर्थक्षेत्र पोलीस मित्र' हा उपक्रम दि. २३ ते दि. २७ जुलै दरम्यान राबविण्यात येणार असून, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि वारकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी रा. से. यो. चे स्वयंसेवक पोलीस प्रशासनास सहकार्य करतील तसेच दि. २२ ते दि. २७ जुलै या कालावधीत दर्शन रांगेतील वारकरी व भाविकांसाठी आरओ शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी' हे स्वच्छता अभियान दि. २२ जुलै आणि दि.३० जुलै रोजी राबविण्यात येईल. यामध्ये गोपाळपूर ते रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर परिसर स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय दि. २३ जुलै रोजी झेप फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे दिंडी' काढून मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. दि. २४ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' (फिजिओथेरपी सेवा) हा उपक्रम राबवून दीर्घ पायी चाललेल्या वारकऱ्यांना मोफत फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आषाढी वारीच्या संपूर्ण कालावधीत स्वेरीच्या रा. से. यो.चे स्वयंसेवक विद्यार्थी 'सेवा हीच साधना' या भावनेतून तहान-भूक विसरून वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतील. सदर उपक्रमांचे आयोजन स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतिश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, प्रा. हेमंत बनसोडे, प्रा. नितीन शिंदे तसेच विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

0 Comments