पंढरपूर / प्रतिनिधी
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहतूक सुविधेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत एसटीतून प्रवास केला.
यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती शुभम आगावणे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, आधार प्रमुख योगेश लिंगायत, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, सांगोला स्थानक प्रमुख पंकज तोंडे, नगरसेवक संजय बंदपट्टे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, लखन चौगुले, विनोद लटके, द्रोणाचार्य हाके, विनोद सुरवसे, बशीर तांबोळी, आमीन शेख यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याने सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगितले. नव्याने दाखल झालेल्या पाच राजमाता जिजाऊ बसमुळे यात्रेच्या काळात प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल, तसेच पंढरपूर आगाराची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आषाढी यात्रेत पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध मार्गांवर अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात येत असून नव्याने दाखल झालेल्या एसटी बसेसमुळे भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची सोय होणार आहे. यात्रेदरम्यान वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने आवश्यक नियोजन केले असून या बस त्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याचबरोबर स्थानिक नागरिकांची ही सोय होणार आहे.

0 Comments