या दिवशी देशभर विविध शासकीय कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण होते. मुलांच्या छोट्या सायकलींवर तिरंगा डौलाने फडकतो, काही मुले आई-वडिलांच्या दुचाकीवरही राष्ट्रध्वज लावण्याचा हट्ट धरतात. शाळेत संचलन होते, मिठाई वाटली जाते आणि कार्यक्रम संपला की बच्चे कंपनी आनंदाने घरी परतते.
विद्यार्थ्यांना सुट्टी मिळते, कार्यक्रम होतो, मिठाई मिळते म्हणून ते खुश होतात. पण या सगळ्याच्या पलीकडे १५ ऑगस्टचा खरा अर्थ त्यांच्या मनात रुजतो आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.
माझ्या मते, लहानपणापासूनच मुलांना हिंदुस्थान स्वतंत्र कसा झाला, त्यासाठी किती मोठा संघर्ष झाला, किती लोकांनी त्याग केला आणि कित्येकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, याचा इतिहास समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
इतिहास शिकवणे म्हणजे फक्त घडून गेलेल्या घटना पुन्हा पुन्हा सांगणे नव्हे. इतिहास म्हणजे वर्तमान पिढीला आपल्या भूतकाळातील त्याग, संघर्ष आणि मूल्यांची जाणीव करून देणे.
स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. काहींनी तुरुंगवास भोगला, काहींनी कुटुंबाचा त्याग केला, तर काही हसत हसत फासावर गेले.
त्यांच्या त्यागामध्ये केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचा रोष नव्हता; त्यामध्ये भावी पिढी स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगावी, अशी तीव्र इच्छा होती.
“कशास आई, भिजविसी डोळे,
उजळ तुझे भाल!
रात्रीच्या गर्भात असे
उद्याचा उषःकाल!”
आणखी पुढे—
“सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते,
उठतील त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते!”
आणि—
“गर्जा जयजयकार क्रांतीचा,
गर्जा जयजयकार!
अन् वज्रांच्या छातीवरती
घ्या झेलुनी प्रहार!”
या ओळी आपण शांतपणे वाचल्या, त्यांचा अर्थ समजून घेतला, तर स्वातंत्र्यवीरांच्या मनात देशासाठी काय भावना होत्या याची कल्पना येते.
स्वतःच्या मृत्यूची पर्वा न करता त्यांनी भविष्यातील भारताचे स्वप्न पाहिले होते.
म्हणूनच स्वातंत्र्याचा इतिहास सांगताना अहिंसक आंदोलनाचे योगदान जितके महत्त्वाचे आहे, तितकेच क्रांतिकारकांचे बलिदान, सशस्त्र संघर्ष, जनतेचा सहभाग आणि इतर विविध प्रवाहांचे योगदानही विद्यार्थ्यांना समजले पाहिजे.
आपण एकाच बाजूचा इतिहास सांगून भावी पिढीसमोर स्वातंत्र्यलढ्याचे संपूर्ण चित्र उभे करू शकत नाही.
इतिहासातील सर्व महत्त्वाच्या योगदानांचा आदर करणे, हेच खरे इतिहासाचे शिक्षण आहे.
देशप्रेम म्हणजे नक्की काय?
देशप्रेम म्हणजे फक्त १५ ऑगस्टला तिरंगा लावणे नव्हे.
देशप्रेम म्हणजे राष्ट्रध्वजाचा आदर करणे.
देशप्रेम म्हणजे देशाच्या कायद्याचा आदर करणे.
देशप्रेम म्हणजे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे.
देशप्रेम म्हणजे संकटात देशबांधवांच्या मदतीला धावून जाणे.
देशप्रेम म्हणजे सैनिकांच्या बलिदानाची जाणीव ठेवणे.
आणि सर्वांत महत्त्वाचे—
देशाच्या भविष्यासाठी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे.
आज आपल्या देशात कुठेही एखादी दुर्घटना घडली की सर्वात आधी कोणता फोटो मिळतो, कोणता व्हिडिओ मिळतो, कोणती बातमी सर्वात आधी दाखवता येते, याची स्पर्धा सुरू होते.
बातमी देणे आवश्यक आहे; पण माणुसकीची मर्यादा राखणे त्याहून आवश्यक आहे.
देशावर संकट आले असताना आपल्या हातातील कॅमेरा केवळ बातमीचे साधन नसतो; तो आपल्या संवेदनशीलतेचीही परीक्षा असतो.
आपण विकासाच्या शर्यतीत खूप पुढे आलो आहोत. रेडिओ, कृष्णधवल दूरदर्शन, पेजर, डायल फोनपासून आज स्मार्टफोन, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सपर्यंतचा विकासाचा संपूर्ण कालखंड आपण अनुभवला आहे.
ही प्रगती निश्चितच अभिमानाची आहे.
पण प्रश्न असा आहे की—
तंत्रज्ञानाने आपल्याला पुढे नेले, तसे आपल्या विचारांनीही आपल्याला पुढे नेले आहे का?
आपण जुने तंत्रज्ञान विसरतो, जुन्या वस्तू बाजूला ठेवतो—हे स्वाभाविक आहे.
पण ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, त्यांचा इतिहास विसरणे योग्य आहे का?
तंत्रज्ञान जुने झाले म्हणून ते बदलावे;
पण इतिहास जुना झाला म्हणून तो विसरू नये!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले—
“की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने,
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने;
जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे,
बुध्द्याचिया वाण करी हे धरिले सतीचे!”
स्वतःचा, कुटुंबाचा आणि सुखाचा त्याग करावा लागेल, याची पूर्ण कल्पना असूनही स्वातंत्र्याचे हे व्रत त्यांनी स्वीकारले.
त्या पिढीने देशासाठी जे सहन केले, त्याची तुलना आजच्या सुखसोयींच्या जीवनाशी केली तर आपल्याला त्यांच्या त्यागाची खरी उंची जाणवते.
आपले सण, उत्सव आणि परंपरा आपली संस्कृती जिवंत ठेवतात. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे केवळ ध्वजारोहणाचे दिवस न राहता आपल्या राष्ट्रभावनेचे आत्मपरीक्षण करण्याचे दिवस व्हावेत.
आपल्या मुलांच्या हातात तिरंगा द्या; पण त्याबरोबर त्या तिरंग्यामागचा इतिहासही द्या.
त्यांना स्वातंत्र्याचा आनंद द्या; पण त्यासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीवही द्या.
त्यांना आधुनिक भारताचे स्वप्न दाखवा; पण त्या स्वप्नासाठी स्वतःचे वर्तमान अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची ओळखही करून द्या.
कारण—
🇮🇳 तिरंगा फडकला पाहिजे केवळ आकाशात नाही,
तो प्रत्येक भारतीयाच्या मनातही फडकला पाहिजे! 🇮🇳
विकास होऊ दे, आधुनिकता येऊ दे, जगाच्या बरोबरीने भारत पुढे जाऊ दे; पण त्याचवेळी देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, संस्कृती आणि बलिदानाची जाणीवही जिवंत राहू दे.
ज्यांनी आपल्या उद्यासाठी आपला आज दिला, त्यांचे स्मरण आपण उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवू या.
स्वातंत्र्य मिळाले आहे;
पण स्वातंत्र्याची किंमत विसरता कामा नये.
🇮🇳 व्यर्थ ना हो बलिदान! 🇮🇳
श्री. व्ही. व्ही. कुलकर्णी
पंढरपूर
मो. 9767473727 / 9768473727

0 Comments