पंढरपूर- सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. त्या अनुषंगाने त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांच्या माध्यमातून गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व अनेक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून सोडविणारे शिक्षकनेते प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे सर व भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. प्रशम कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, नियुक्ती व सेवा विषयक एकूण ३७ प्रकरणे सोडवली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने कार्यवाही करत एकाच दिवसात ३७ प्रकरणांची सोडवणूक करून न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
श्री मल्लिकार्जुन विद्या विकास प्रशाला, किणीचे मुख्याध्यापक श्री. फरीद जमादार यांच्या मुख्याध्यापक पदास अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी शिक्षकनेते प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व डॉ. प्रशम कोल्हे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून प्रशालेच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मुख्याध्यापक पदास मिळालेली ही मान्यता शाळेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक सक्षम व गतिमान दिशा देणारी ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि प्रशालेच्या सर्वांगीण प्रगतीसाठीही या मान्यतेला विशेष महत्त्व आहे. प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे सर यांच्या प्रयत्नातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे श्री. फरीद जमादार यांच्या मुख्याध्यापक पदास मान्यता मिळणे शक्य झाले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षकनेते व प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे यांचे अभिनंदन केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सेवा विषयक प्रश्न निकाली काढण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने गुरुवारी विशेष मोहीम राबवत प्रशासनाच्या प्रलंबित कामकाजाला वेग दिला आहे. या अनुषंगाने दिवसभर सुरू असलेल्या सुनावणीत विविध प्रस्तावांची छाननी करून एकाच दिवसात तब्बल ३७ प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला असून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने धडाकेबाज कार्यवाही केली आहे. याचा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षण क्षेत्रात या कार्यवाहीचे कौतुक होत आहे. त्यापैकी चार महत्त्वाच्या प्रकरणांचे ऑनलाइन आदेश तातडीने निर्गमित झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या विशेष उपक्रमामध्ये पदोन्नती, नियुक्ती, मान्यता तसेच अनुकंपा तत्त्वावरील भरतीसंबंधी प्रस्तावांना प्राधान्य देण्यात आले. टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेतील रिक्त सहशिक्षक पदावर अर्जुन खटके यांच्या नियुक्तीस मंजुरी मिळाली. बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील माध्यमिक विद्यालयात मेघा साखरे यांची अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली. याशिवाय आणखी एका शिक्षकाच्या पदोन्नतीलाही मंजुरी देण्यात आली. या प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम करून राज्यात लक्षवेधी ठरत असलेले शिक्षकनेते प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केला होता. डॉ. रोंगे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी संबंधित प्रस्तावांची तातडीने छाननी करून आवश्यक आदेश निर्गमित केले. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांना अखेर न्याय मिळाला. सदर संदर्भातील बैठकीस शिक्षकनेते डॉ. बी. पी. रोंगे, विभागीय समन्वयक सुरेश गुंड, सुभाष भिमनवरू, महेश घोंगडे, प्रशांत शिंपी यांच्यासह विविध तालुक्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्षकांच्या सेवा विषयक अडचणी वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रशासन आणि शिक्षक संघटनांमध्ये समन्वय वाढविण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने अल्पावधीत आदेश निर्गमित झाल्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, अशाच प्रकारच्या विशेष सुनावण्या नियमितपणे आयोजित करून प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढावीत, अशी अपेक्षा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

0 Comments