मंगळवेढा (प्रतिनिधी):
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांसाठी पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर आता लाभक्षेत्राचा सर्व्हे होणार आहे. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न मांडल्यानंतर जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी लाभक्षेत्राचा सर्व्हे करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांना वाढीव पाणी मिळण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
म्हैसाळ योजनेत मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांसाठी १.२७ टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात मंजूर पाण्याच्या दहा टक्के पाणीदेखील नियमितपणे मिळत नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवेढा तालुका योजनेच्या टेल एंडला असल्याने कमी दाबाने आणि अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत असल्याचा मुद्दा आमदार समाधान आवताडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला.
या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांसाठी सध्याचे १.२७ टीएमसी पाणी अपुरे आहे. या लाभक्षेत्रासाठी पाच टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील प्रत्यक्ष लाभक्षेत्र, क्षेत्रफळ आणि पाण्याची गरज याचा सर्व्हे करण्याच्या सूचना सचिव एकनाथ डवले यांनी प्रशासनाला दिल्या. सर्व्हेनंतर संबंधित लाभक्षेत्राला पाच टीएमसीपर्यंत पाणी देण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, म्हैसाळ योजनेवरील वितरिका क्रमांक १ व २ वरील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे, यासाठी बंदिस्त पाईपलाईन मंजूर करण्याची मागणीही आमदार आवताडे यांनी केली. बंदिस्त पाईपलाईनमुळे पाणी वितरणातील अडथळे दूर होऊन टेल एंडपर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होणार आहे.
तसेच माण व भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढविण्याच्या कामास मंजुरी द्यावी. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी नाबार्डकडून वित्तपुरवठा मिळण्यास मंजुरी द्यावी, अशा मागण्याही त्यांनी बैठकीत केल्या.
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

0 Comments