सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील घाटणे व अर्जुनसोंड या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसंदर्भातील निवेदने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडे सादर केली.
घाटणे येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या १५ लाख रुपये खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या विद्युत डी.पी.चे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी गावातील विविध प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी गावात सभामंडप, दलित वस्तीत स्वतंत्र सभामंडप, सुरळीत वीजपुरवठा, रस्त्यांची कामे आदी मागण्या मांडल्या.
तसेच अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली असून, अद्यापही त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळालेली नसल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी असलेली एक हेक्टरची अट रद्द करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, मोहोळ तालुक्यातील जनतेने मला भरभरून मते देऊन लोकसभेत पाठविले आहे. त्यामुळे या जनतेचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य असून, गावातील विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.
पुढे बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, जंतरमंतर येथे युवकांनी मोठे आंदोलन करून सरकारविरोधात आवाज उठविला. युवकांच्या आंदोलनामुळे सरकार घाबरले आहे. राहुलजी गांधी यांनी संसदेत युवकांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावर सरकारकडे उत्तर मागितले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अधिवेशनाच्या काळात या प्रश्नावर उत्तर देण्यास टाळाटाळ करत वीस दिवस संसदेतून गायब झाले होते.
यावेळी मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी, प्रदेश चिटणीस सुरेश हावळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, अँड. श्रीरंग लाळे, घाटणेचे सरपंच ऋतुराज देशमुख, उपसरपंच गहिनीनाथ सावंत, बाळासाहेब डुबे पाटील, मोहनराव देशमुख, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, दाजी वाघमोडे, भारत लाळे, विष्णू शिंदे, अमोल पाटील, विश्वनाथ देशमुख, सत्यवान लाळे, राहुल भाळगले, अभिजित दळवे, गुंड मेंबर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments