हिरज (ता. उत्तर सोलापूर) : सीना नदीकाठावरील तिर्हे, हिरज परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वीजप्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे. हिरज येथे अंदाजे दीड कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून करण्यात आले.
गेल्या १० ते १२ वर्षांपासून जागेअभावी हा प्रकल्प प्रलंबित होता. गावभेटीदरम्यान हिरज ग्रामस्थांनी ही समस्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला. सरपंच, उपसरपंच, उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत हरिभाऊ जाधव तसेच ग्रामस्थांनीही सातत्याने प्रयत्न केले. वन विभाग, भूमी अभिलेख कार्यालय आणि इतर संबंधित विभागांकडून आवश्यक ना हरकत दाखले (NOC) मिळविण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्युत उपकेंद्रासाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे प्रलंबित प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी भारत हरिभाऊ जाधव यांनी प्रकल्पातील विविध अडचणी दूर करून आवश्यक NOC मिळविण्यासाठी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पाठपुरावा केल्याबद्दल खासदार प्रणितीताई शिंदे यांचे परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.
यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, सीना नदीकाठावरील तिर्हे व हिरज परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांसाठी हे ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपकेंद्रामुळे कृषी पंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होईल आणि अनेक वर्षांपासूनचा वीजप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. शेतकऱ्यांच्या हिताची आणि गरजेची कामे करण्याला मी सर्वोच्च प्राधान्य देते. आजपर्यंत उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव उपकेंद्रातून या परिसरातील गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषी पंपांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होत होता. नवीन उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्रामीण भागातील वीजप्रश्नावर बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, सरकारच्या घोषणांमध्ये भरपूर वीज आहे; मात्र शेतात आणि घरात अंधार आहे. शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. शेतापासून सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत अखंडित वीजपुरवठा मिळणे हा जनतेचा हक्क आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लोडशेडिंग बंद व्हावे, यासाठी आंदोलन केले असून यापुढेही हा लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला.
उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते कार्यान्वित करण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी सरपंच प्रशांत साबळे, उपसरपंच चंद्रकांत तमशेट्टी, अमोल सलवदे, अमोल गावडे, सचिन गुंड, कदिर पठाण, रफिक पटेल, शाहरुख पटेल, आदिनाथ चटके, महेश गुंड, दादाराव पाटील, सुरेखा पाटील, महेश आसबे, भागवत गायकवाड, अक्रम पठाण, विनायक भोसले, बाबुराव खलीपे, श्रीकांत पाटील, विशाल वाघमारे, अब्दुल मुजावर, मोती चाचा शेख, आप्पाशा आईवळे, राजाराम माने, नारायण पोतदार, संदीप सुरवसे, मिनाज पटेल, दीपक पाटील, दत्ता मल्लाव, रामा जन्मले, बाळकृष्ण कुलकर्णी, ज्ञानेश्वर जन्मले, दर्याप्पा चोपडे, महादेव जन्मले, राहुल जन्मले, विजयसिंह जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments