पंढरपूर / प्रतिनिधी
गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील सर्व गणेशभक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सुबक आणि आकर्षक अशा गणरायाची मूर्ती भेट देण्यात आली. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून प्रभागातील नागरिकांना मोफत गणेशमूर्ती वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांच्या लकेरी गल्ली येथील संपर्क कार्यालयातून गणरायाच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले. दिवसभरात प्रभागातील प्रत्येक घरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन मूर्तींचे वाटप केले.
याप्रसंगी बोलताना दिलीप धोत्रे यांनी सण-उत्सव जल्लोषात विकासकामे जोमात अशी भूमिका मांडली. गणेशोत्सव हा सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही कुटुंबाचा गणेशोत्सवाचा आनंद कमी होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
याचवेळी त्यांनी प्रभागातील विकासकामांचा आढावाही मांडला. ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन बदलण्याचे काम सुरू असून, प्रभागातील रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी अंदाजपत्रके तयार झाली आहेत. काही रस्त्यांच्या निविदाही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रभागातील रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच पद्धतीने पुढील काळात हिंदू-मुस्लिम बांधवांचे सर्व सण-उत्सव एकोप्याने आणि उत्साहात साजरे करण्याचा मनसेचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगत. पंढरपूर शहरात एकही तरुण बेरोजगार राहू नये, नागरिक सुखी-समाधानी राहावेत अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केल्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी पंढरपूर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक लोकेश यादव, श्याम गोगाव, शशिकांत पाटील, अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर, नागेश इंगोले, दिनेश पांढरे, पिंटू गायकवाड, संतोष वाघमारे, दादा घोडके, लखन भांडेकर, संतोष गायकवाड, शफी मुलानी, जमीर सय्यद, सुदर्शन पाटोळे, समाधान पाटोळे, श्रीकांत शिंदे, संदेश शिर्के यांच्यासह नागरिक व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments