न्यु सातारा समूह, मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), कोर्टी, पंढरपूर येथे रियालिटी सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय "एंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रियालिटी सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. चे सहसंस्थापक राहुल दत्तात्रय आणुसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत दिलीप चव्हाण हे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात राहुल आणुसे म्हणाले की, उद्योजकतेच्या प्रवासात जोखीम स्वीकारण्याची मानसिक तयारी असणे अत्यंत गरजेचे आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य दिशा असल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
तर चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधींची माहिती दिली. स्टार्टअप उभारताना नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास किती महत्त्वाचा असतो, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन रुजणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेच्या वतीने भविष्यातही असे उपयुक्त उपक्रम सातत्याने राबवले जातील, असा विश्वासही त्यांनी दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये विशेषतः ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांनी घेतलेले परिश्रम उल्लेखनीय ठरले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ. सातपुते मॅडम यांनी काम पाहिले.

0 Comments