येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), कोर्टी, पंढरपूर येथे सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी "स्ट्रक्चरल एलिमेंट्स ऑफ मायनर ब्रिजेस अँड कल्व्हर्ट्स - लोड अँड बिहेविअर" या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. एस. एम. आवताडे प्रा. लि., मंगळवेढा येथील प्रोजेक्ट हेड श्री. एन. आर. पोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री. पोरे यांनी विद्यार्थ्यांना छोट्या पुलांच्या आणि कल्व्हर्टच्या रचनेतील मूलभूत तांत्रिक घटकांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुलांवर पडणाऱ्या डेड लोड, लाईव्ह लोड, इम्पॅक्ट लोड तसेच अर्थ प्रेशर यांसारख्या विविध भारांचे तांत्रिक विश्लेषण उलगडून सांगितले. तसेच पूल आणि कल्व्हर्ट यांमधील मुख्य तांत्रिक फरक आणि रस्ते बांधणीतील त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या लोडिंग कंडिशन्समध्ये स्ट्रक्चरल घटक कशाप्रकारे काम करतात, याचे सखोल तांत्रिक ज्ञान त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, तसेच उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री. विशाल बाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सिव्हिल अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. ऋतुजा पवार यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या तांत्रिक ज्ञानामुळे त्यांचा तंत्रज्ञानाचा आणि प्रत्यक्ष कामाचा पाया अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

0 Comments