पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात प्रसिद्ध गायक रोहित पुजारी आणि सारेगमप विजेते ख्यातनाम गायक चैतन्य देवढे माऊली यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. पहिल्या सत्रात रोहित पुजारी यांनी ‘आता कोठे धावे मना’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘दत्तगुरू माऊली’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ यांसारख्या रचना सादर करून भक्तिरसाची अनुभूती दिली.
दुसऱ्या सत्रात चैतन्य देवढे माऊली यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषाने सुरुवात करत ‘सूर निरागस हो’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ आणि ‘अवघे गरजे पंढरपूर’ यांसारख्या लोकप्रिय अभंगांनी रसिकांच्या हृदयात चैतन्य निर्माण केले. त्यांना ज्ञानेश्वर दुधाणे, मयूर मोरे, सारंग भोळे, संकेत देहाडे, माऊली पिसे आणि वैभव केंगार यांनी सुरेल वाद्यसंगत केली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले. आगामी तीन दिवसांत महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक-गायिकांचे कार्यक्रम होणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments