LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध**कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून राजापूर, बुरलेवाडी येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी**पिकांची स्थिती व उपलब्ध पाणीसाठ्याचा घेतला आढावा; पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश*



पंढरपूर, दि. ९ (उमाका) : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगोला तालुक्यातील राजापूर व बुरलेवाडी येथे दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खरीप पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ, पाणी उपलब्धता आणि शेतीच्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

यावेळी कृषिमंत्री भरणे म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि पंचनाम्यांची कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करावी.

पावसातील खंडामुळे राज्यात सुमारे एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत सुमारे एक कोटी हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनाम्यांचे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा याबाबत नियोजन करून टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून नियमानुसार मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य पीक नुकसानीबाबतच्या अडचणी मांडल्या. कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील उपलब्ध पाणीसाठा आणि शेतीच्या नुकसानीची वस्तुस्थिती कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. खरीप पिकांसह इतर पिकांनाही दुष्काळाचा फटका बसल्याचे नमूद करून पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.

या पाहणी दौऱ्यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी दिपाली जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0000

Post a Comment

0 Comments