राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रूही नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आला आहे. एकमेकांना राजकीय आव्हान देणारे, जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागणारे आणि एकमेकांना शब्दांनी घायाळ करणारे रामभाऊ तथा रामराजे नाईक-निंबाळकर आणि जयाभाऊ तथा जयकुमार गोरे चक्क एकाच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसलेले पाहायला मिळाले. निमित्त होतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचं!
मोगराळे घाटापासून पिलीवच्या घाटापर्यंत ज्यांच्या राजकीय संघर्षाची चर्चा रंगली, त्या दोन नेत्यांची अशी जवळीक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल!
रामभाऊ आणि जयाभाऊ यांच्यातील राजकीय संघर्ष माण-खटाव आणि फलटणच्या जनतेसाठी नवीन नाही. दोघांनीही एकमेकांना वेळोवेळी खुले आव्हान दिले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. राजकीय सभांमधून एकमेकांची शाब्दिक कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. दोघांची राजकीय शैली वेगळी, कार्यपद्धती वेगळी; पण राजकीय डावपेच आखण्यात दोघेही मुरलेले!
रामभाऊंची राजकीय खेळी म्हणजे थेट मुद्द्याच्या वर्मावर बोट ठेवणारी. समोरच्याला विचार करायला लावणारी. तर जयाभाऊंची शैलीही काही कमी नाही. एखादी गोष्ट लक्षात ठेवली की त्यावर योग्य वेळी उत्तर देण्याची त्यांची पद्धत! त्यामुळे दोघांमधील राजकीय संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय राहिला.
रामभाऊ माणच्या दहिवडीत गेले की जयाभाऊंकडून फलटणमध्ये राजकीय प्रत्युत्तराची तोफ डागली जायची, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असे. या संघर्षात अनेकदा प्रशासनातील अधिकारीही राजकीय समीकरणांच्या चर्चेत ओढले गेले. दोन्ही बाजूंनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाला.
मात्र, राजकारणात कोणती समीकरणे कधी बदलतील, हे सांगता येत नाही. कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे नेते आज एकाच व्यासपीठावर बसून गप्पांची मैफल रंगवताना दिसतात, हेच राजकारणाचं वैशिष्ट्य!
मागील काही दिवसांतही दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चा रंगल्या होत्या. पण जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकाच मंचावर आले आणि अगदी शेजारी बसून संवाद साधताना दिसले. विशेष म्हणजे, या वेळी वातावरणात पूर्वीच्या राजकीय संघर्षाचा तणाव दिसण्याऐवजी गप्पांचा फड रंगलेला पाहायला मिळाला.
ही केवळ एका कार्यक्रमातील भेट होती की बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कारण राजकारणात कालचा कट्टर विरोधक आजचा सहकारी होऊ शकतो आणि आजचा सहकारी उद्या विरोधात उभा राहू शकतो. त्यामुळे रामभाऊ आणि जयाभाऊंच्या या एकाच व्यासपीठावरील उपस्थितीने अनेक राजकीय चर्चांना नवा विषय मिळाला आहे.
खरंच, कधी वाटलं होतं का की एकमेकांना पाण्यात पाहणारे रामभाऊ आणि जयाभाऊ एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसतील?
राजकारण म्हणजे शक्यतांचा खेळ… आणि या खेळात कधी कोणाची कुणाशी गट्टी जमेल, हे फक्त राजकारणालाच माहीत!
---
पंढरपूरचं निर्भीड आपलं मत
संपादक व मुख्य संपादक : प्रमोद वसंत भोसले

0 Comments