पंढरपूर, दि. १५ : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात देवश्री दंडवते आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांच्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय संगीत, भक्तिगीते आणि अभंगांच्या सुरेल संगमातून सादर झालेल्या या मैफलीने उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी व्यवस्थापक प्रवीणकुमार घम व मान्यवर कलाकारांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्रात देवश्री दंडवते यांनी राग भूपमधील तिलवाडा तालातील सादरीकरणातून शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली. त्यानंतर ‘जय दुर्गे भवानी’, ‘नाचत गुरुभजनी’, ‘मी गातो नाचतो’, ‘कृष्ण देखिला’ आणि ‘अगा वैकुंठीच्या राया’ या रचनांनी रसिकांची दाद मिळवली. भैरवीतील सादरीकरणाने त्यांनी गायनाची सांगता केली.
दुसऱ्या सत्रात आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्ञानेश्वरी गाडगे यांनी राग यमनने गायनाची सुरुवात केली. ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘जय देवी माता भवानी’, ‘येग येई विठाबाई’, ‘सोहम वर डमरू बाजे’ आणि ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ यांसारख्या रचनांनी मैफलीत रंग भरला. ‘लय नाही लय नाही’ या भैरवीतील सादरीकरणाने त्यांनी गायन सेवेची सांगता केली. दोन्ही कलाकारांनी आपली गायनसेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली.
या कार्यक्रमाला माऊली खरात, ज्ञानेश्वर दुधाणे, माऊली पिसे, सुमंगल टेंगसे आणि ओजस रानडे यांनी सुरेल साथसंगत केली. माधव कुलकर्णी यांनी निवेदन केले, तर ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. सर्व कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्य व कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव सुरू आहे. पुढील सहा दिवस महाराष्ट्रातील नामवंत गायक-गायिकांच्या संगीत मैफलींचा लाभ रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

0 Comments