पंढरपूर, दि. १५ ऑक्टोबर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवातील तिसरी स्वरांची माळ भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. कुमार गंधर्व यांचे नातू पं. भुवनेश कोमकली यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्य आणि कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम व मान्यवर कलाकार यांच्या हस्ते श्री विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मधुकर पाटील यांनी ‘संतसाहित्याची परंपरा आणि वारकरी संप्रदाय’ या विषयावर विचार मांडले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी संतपरंपरेच्या सामाजिक योगदानाचा आढावा घेतला.
ते म्हणाले की, वारकरी संप्रदायातील संतांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करून देशात समता, बंधुता व मानवतेची शिकवण दिली. संतसाहित्य ही केवळ भक्तीची परंपरा नसून सामाजिक एकात्मता आणि मानवी मूल्ये जपणारी चळवळ आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा वारकरी परंपरेतील सामूहिक भक्तिभाव आणि शिस्तीचे आदर्श उदाहरण आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेल्या नव्या पिढीला संतविचार व अध्यात्माशी जोडणे आवश्यक आहे. वारकरी परंपरेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवून अध्यात्मिक चळवळ अधिक बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. पाटील यांनी केले.
दुसऱ्या सत्रात पं. भुवनेश कोमकली यांनी नंद रागातील ‘गोविंद बीन बजायी, राजन तो आजा’ या रचनेने मैफलीला सुरुवात केली. त्यानंतर तिलंग रागातील ‘बासुरी बजायी’ ही बंदिश सादर करून त्यांनी आपल्या शास्त्रीय गायकीतील स्वरवैविध्याचे दर्शन घडविले.
यानंतर पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेल्या ‘गुरा तो जीने’, ‘काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठल’, ‘निके निके चलन लागी’ आणि ‘नाम घेता वाया गेला’ या अभंगरचनांच्या सादरीकरणातून भक्तिरसाची अनुभूती दिली. रसिकांच्या आग्रहास्तव ‘सुनता है गुरु ज्ञानी’ ही रचना सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांच्या गायनाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या मैफलीला तबल्यावर श्रीधर मांडरे, हार्मोनियमवर स्वानंद कुलकर्णी, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे आणि टाळाची साथ माऊली पिसे यांनी केली. कलाकारांच्या सुरेल साथसंगतीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.
श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाच्या आगामी चार दिवसांत महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक-गायिकांचे कार्यक्रम होणार आहेत. संगीतप्रेमी व भाविकांनी या सांगीतिक पर्वाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

0 Comments