LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह पशुपालकांच्या व्यथा जाणून घेत खासदार प्रणिती शिंदे यांचा शिवणगी, बोराळे गावांचा दौरा*👉 *शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, घोषणा नकोत; आता प्रत्यक्ष मदत द्या — खासदार प्रणिती शिंदे*



मंगळवेढा : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शिवणगी आणि बोराळे या गावांचा दौरा करून शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाअभावी करपलेली पिके, रखडलेले पंचनामे, आर्थिक अडचणी, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत पुढाकार घेतला.

शिवणगी येथील ग्रामस्थांनी गावातील पाण्याची भीषण परिस्थिती खासदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी गावातील तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर तलाव परिसरात विहीर घेणे शक्य आहे का, याची चाचपणी त्यांनी केली. यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले. सीएसआर (CSR) निधीतून विहीर घेऊन त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा करता येईल का, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या पर्यायातून गावाच्या पाणीप्रश्नावर मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आशा निर्माण झाली आहे.
           गावातील वाडी-वस्त्यांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविताना रस्त्यांची दुरवस्था अडथळा ठरत असल्याची बाबही ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मोठ्या टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी वाडी-वस्त्यांवर पाणी पोहोचविण्यासाठी छोटे टँकर पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

           दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारी असून, पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. या गंभीर परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारींकडेही त्यांनी लक्ष वेधले.
          जेव्हा निसर्ग साथ देत नाही, तेव्हा सरकार मायबाप असते. मात्र, सरकारने ही भूमिका योग्य पद्धतीने बजावली पाहिजे. अतिशय तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा अपमान करू नका. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असे स्पष्ट मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
          सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी केवळ घोषणांवर न थांबता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक आहे. संकटाची तीव्रता लक्षात घेऊन वेळकाढूपणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदतीची रक्कम जमा करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
          दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच पशुपालकांनाही बसत असल्याचे नमूद करत खासदार प्रणिती शिंदे यांनी दुष्काळग्रस्त गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली. तसेच, शेतमजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी गावागावांत रोजगाराची कामे उपलब्ध करून द्यावीत आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
          आस्मानी संकटाने आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर सुलतानी संकट लादू नका. आता केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष मदत द्या. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा ठाम निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

या दौऱ्यादरम्यान जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, तालुका प्रसिद्धी प्रमुख संदीप पवार, शहाजी कांबळे, राजन ठेंगील, बिराप्पा बंडगर, भारत कांबळे, संजय गावडे, आप्पासाहेब गावडे, रामचंद्र कांबळे, सुनील सोमुते, अविनाश सोमुते, बिराप्पा पडवळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩ (tp) ۩ஜ▬▬▬
हा नंबर आपल्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये अँड करा 8010505458
तिरुपती परकीपंडला
काँग्रेस मिडिया प्रमुख सोलापूर काँग्रेस

Post a Comment

0 Comments