LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर ते घुमान सायकल दिंडीचे आयोजन


 

पंढरपूर- संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा व समतेचा संदेश विविध राज्यात पायी फिरून दिला होता. त्याच मार्गावरून भागवत धर्म प्रसारक समितीच्या वतीने पंढरपूर ते घुमान पर्यंत सायकल रॅली आयोजित केली असून याचा शुभारंभ कार्तिकी एकादशी दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक सुर्यकांत भिसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

संत नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंती निमित्त व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त सदर अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील पुजारी रवींद्र गुरव यांच्या संकल्पनेतून तसेच भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद, श्री नामदेव दरबार कमिटी घुमान व श्री संत नामदेव शिंपी समाज यांच्या विद्यमाने सदर सायकल दिंडी होत आहे.

वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव महाराजांना मोठा मान आहे. महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात फिरून भागवत धर्म, समता, बंधुता याची शिकवण दिली होती. यामुळेच शिखांच्या धर्मग्रंथामध्ये देखील महाराजांचे अभंग आहेत. नामदेवरायांनी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब मध्ये पायी धर्मप्रचार केला. त्याच रस्त्यावरून सदर सायकल दिंडी जाणार आहे. या सायकल दिंडीमध्ये ११० सायकलपटू सहभागी होणार आहेत. संपूर्ण अंतर २३०० कि.मी. असून रोज शंभर कि.मी. अंतर सायकलपटू पार करणार आहेत. या दिंडी बरोबर रथ देखील असून यामध्ये नामदेवराय यांची मूर्ती व पादुका असणार आहेत. दिंडीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रात्री भजन, किर्तनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर निघणारी ही पहिलीच अध्यात्मिक यात्रा असल्याचा दावा भिसे यांनी केला आहे.

४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीस पंढरपूरात येणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायकल दिंडीचा शुभारंभ होणार असून २८ नोव्हेंबर रोजी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चंदीगड येथील राजभवना मध्ये याचा समारोप होणार आहे.

या पत्रकार परिषदेस संत नामदेव महाराज यांचे वंशज ज्ञानेश्‍वर महाराज नामदास, शिंपी समाज अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, राजेश धोकटे, सुनील गुरव, गणेश जामदार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments