सांगली प्रतिनिधी :-
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्यांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी कारवाईचे पाऊल उचलले. राईट वे सपोर्ट सिस्टीम आणि ब्रेटवेल ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स या कंपन्यांवर अनुक्रमे आटपाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आटपाडी पोलीस ठाण्यात राईट वे सपोर्ट सिस्टीमचे बापूसाहेब महादेव वाघमारे (वय ५०), रमेश दशरथ पाटील-कातुरे (वय ४२ रा. दोघेही झरे, ता. आटपाडी) आणि सुरेश सखाराम कारंडे (रा. सांगलीवाडी) यांच्यावर तर ब्रेटवेल ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे अमित रमेश भंडारे (रा. कौलगे, ता. तासगाव) आणि रोहिणी दिनकर सूर्यवंशी (रा. सूर्यगाव, ता. पलूस ) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी जिल्ह्यातील अनेकजण सारासार विचार न करता विविध कंपन्यांच्या आर्थिक भुलभुलय्यात गुरफटत चालले आहेत. बँकांचे ठेवीवरील व्याजदर कमी होत असताना काही कंपन्या शेअर मार्केटचा भुलभुलय्या उभा करुन गुंतवणूकदारांना आपल्याच कंपनीत गुंतवणूक करण्यास आकर्षिक करीत आहेत. त्याला अनेकजण बळी पडत आहेत. जिल्ह्याचा विचार केल्यास आतापर्यत सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक नानाविध कंपन्यांनी केली असल्याची माहिती आहे. असे असले तरी पोलिसांकडे तक्रारी मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन कंपन्यांमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले असतील आणि त्यांची फसवणूक झालेली असेल त्यांनी तातडीने त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांसह पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments