सोलापूर : काँग्रेस पक्षाचे माजी खासदार संदीपान थोरात यांचे आज उपचारादरम्यान सोलापुरात निधन झाले. थोरात हे पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आले होते. थोरात यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सखुबाई थोरात, चार मुलगे आणि तीन मुली असा परिवार आहे.
संदीपान थोरात यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही ११ मार्च रोजी सोलापुरातील खासगी रुग्णालयात रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची अस्थेवाईकपणे चर्चा केली होती.
संदीपान थोरात हे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. माजी खासदार संदिपान थोरात हे 1977 ते 1999 या कालावधीत पंढरपूरचे सलग सात वेळा खासदार होते. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ म्हणून थोरात प्रचलित होते.
पंढरपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यात थोरातांचा स्वभाव आणि त्यांचे राजकारण महत्वाचे मानले जाते. पंढरपुरात सात वेळा निवडून आलेले संदीपान थोरात हे शेवटपर्यंत गांधी परिवाराशी एकनिष्ठ राहिले.


0 Comments