पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर शहरात यूवा वर्गात विविध स्पोर्ट्स बाईकवर बसून वेगात गाड्या पळविण्याचा फॅड बोकाळले असून यामुळे प्रचंड वेगात आदळून अपघात होत आहेत.
वेगाने मोटरसायकल पळविल्याने मागील १५ दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित घराण्यातील केवळ वीस वर्षाचा युवक लिंक रोड परिसरात पाण्याच्या टाकीजवळ घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुणे येथे विविध पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पंढरपूर येथे विविध नामाकिंत कंपन्यांच्या इम्पोर्टेड दुचाकी अनेकांनी घेतल्या आहेत. मुळातच या गाड्या वेगासाठी प्रसिद्ध असल्याने युवक सुसाट वेगाने जात असतात. लिंक रोड हा दुपदरी आणि गुळगुळीत केला आहे. यामुळे अनेक वाहने सुसाट धावत असतात. रस्ते चांगले असले तरी स्पीडला मर्यादा असते. पण तारुण्याच्या जोशात युवकांना भान राहत नाही.
या रस्त्यावर काही युवक रेसिंग बाईक घेऊन रेस लावतात. अशाच प्रकारात. वेगाने दुचाकी धडकून एका ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला, आणि गाडी चालविणारा देखील पडून गंभीर जखमी झाला.
वाळू तस्करी व ईतर अवैध धंद्यात गुंड प्रवृत्तीच्या घराण्यातील युवक झटपट पैसा मिळवीत आहेत.
असे युवक दीड, अडीच लाखांच्या रेसिंग बाईक खरेदी करीत अनेक गैरप्रकार करीत आहेत. काही उनाड मुले शहरातील अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या बोळातूनही प्रचंड वेगाने कट मारीत गाड्या हाकत आहेत. याचा त्रास पंढरीत येणाऱ्या भाविकांना देखील सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी जाब विचारला तर उलट त्यांनाच दमदाटी केली जाते.


0 Comments