१० ब्रास वाळू साठा, ४ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर, (प्रतिनिधी) अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे कासेगांव (ता.पंढरपूर) येथे अवैध वाळू साठ्यावर धडक कारवाई केली असून, त्यामध्ये १०ब्रास वाळू व ४ लाख ५७हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक व साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. अवैध गौण खनिज विरोधी पथकाने मौजे कासेगाव येथील गट नंबर २७/ १अ येथे अचानक भेट दिली असता, सदर ठिकाणी गणेश मनोहर गंगथडे व चैतन्य मनोहर गंगथडे यांच्या नावे असलेल्या गट नंबर २७/ १अ मध्ये १० ब्रास अवैधरित्या वाळूसाठा केलेला दिसून आला. तसेच सदर वाळू साठ्याच्या ठिकाणी एमएच ११ एजी २२७४या क्रमांकाचा वाळूसाठी वापरण्यात येणारे पिकअप हे वाहन दिसून आले. तसेच वाहनामध्ये वाळू भरण्यासाठी वापरलेले साहित्य आढळून आले.
सदर ठिकाणी अवैध वाळू साठा केल्याचे निर्देशनास आल्याने भरारी पथकाव्दारे धडक कारवाई करुन १० ब्रास वाळू व पिकअप जप्त करुन शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे ठेवण्यात आले आहे. सदर वाळू साठा केल्या प्रकरणी गणेश मनोहर गंगथडे व चैतन्य मनोहर गंगथडे यांचे विरुद्ध तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर येथे एफआयआर नं.४७२ नुसार भारतीय दंड संहिता १९६० कलम ३७९व ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये महसूल नायब तहसीलदार पी. के कोळी, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे, तलाठी मुसाक काजी, राहुल गुटाळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल सहभागी झाले होते.


0 Comments