विकृत मानसिकतेतून भाजपकडून पक्ष फोडीचे राजकारण
: रोपळे येथील कार्यक्रमात मांडला भाजपच्या सत्तेचा सारीपाट : लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन
फोटो : कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर.
प्रतिनिधी पंढरपूर
फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीतिमत्ता सध्या भाजप वापरत असून त्यामुळे लोकशाहीने आलेल्या सत्ताही जबरदस्तीने हिसकावून घेतल्या जात आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. सामान्य जनतेच्या विकासापेक्षा स्वतःचे घबाड भरायचे या विकृत मानसिकतेतूनच भाजप सत्तेमध्ये येण्यासाठी पक्ष फोडीचे राजकारण करीत आहे. असा घनाघाती आरोप सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसच्या वतीने माथाडी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी पुणे मनपाचे नगरसेवक अविनाश बागवे, कलावंत कोमल पाटोळे, शाहीर नंदकुमार पाटोळे, काँग्रेसचे नानासाहेब पालकर, शंकर सुरवसे , राजाभाऊ उराडे, अमर सूर्यवंशी, अक्षय शेळके, राजू मस्के, नारायण गायकवाड, सिद्धेश्वर भोसले, प्रशांत साळे, सुलेमान तांबोळी, किशोर पवार, राहुल पाटील, किशोर जाधव, हनुमंत मोरे, ज्येष्ठ नेते बजरंग बागल, दीपक पिंजारी, संग्राम जाधव, पप्पू काळे, नागनाथ माळी, बापू अवघडे, श्रीमंत मस्के, अभिषेक कांबळे, शिवाजी जाधव, सुरेश मस्के, बाजीराव कांबळे, प्रकाश साठे, सरपंच शशिकला चव्हाण, नागनाथ देवकते, शिवाजी पवार, जगन्नाथ जाधव, अनिल पाटोळे, राहुल शिंदे, देविदास कसबे, नंदकुमार चव्हाण, नितीन गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
पुढे बोलताना धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की, आपला देश हा भांडवलशांच्या हातामध्ये सोपविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असून हा प्रयत्न मोडीत काढण्यासाठी जनतेने आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला साथ दिली पाहिजे. अन्यथा लोकशाही धोक्यात येणार असून भविष्यामध्ये निवडणुकाच होणार नाहीत. सध्या महागाई बेकारी असे अनेक प्रश्न जनतेला पोखरत असून याला भाजप सरकारच जबाबदार आहे. जनतेने आता या सरकारलाच त्यांची जागा दाखविली पाहिजे. अशोक पाटोळे यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यकाळातही त्यांच्या कार्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असेल असेही धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.
तर यावेळी पुणे मनपाचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी भाजपावर सडेतोड टीका करत लोकशाही टिकवण्यासाठी भविष्यकाळात काँग्रेस हाच एक पक्ष भक्कम पर्याय असल्याचे सांगितले. तर प्रस्ताविकामध्ये अशोक पाटोळे यांनी एमआयडीसी, रस्ते दुरुस्ती, पारधी समाज आरक्षण, पारधी समाजात राहण्यासाठी जागा अशा विविध मागण्या मांडल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक वैजनाथ रणदिवे यांनी केले. तर आभार सुदर्शन पाटोळे यांनी मांडले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
चौकट
माविआच्या जागा वाटपानंतरच माढा लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय......
महाविकास आघाडी करून लोकसभेच्या जागेंबाबत निर्णय झाल्यानंतरच माढा लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारीचा निर्णय आपण घेणार आहोत. सध्या आपले नाव जरी चर्चेत असले तरी वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतोय यावरच सर्वकाही अवलंबून आहे. तोपर्यंत कोणतेही भाष्य करणे योग्य राहणार नाही.
धवलसिंह मोहिते पाटील (अध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेस)
0 Comments