पंढरपूर अर्बन बँकेच्या गैरकारभाराविरोधात पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांचे लाक्षणिक उपोषण!
पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पंढरपूर या बँकेच्या गैरकारभाराविरोधात पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष भोसले हे दिनांक 30 ऑक्टोबर रोजी उपोषणास बसणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ते पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, पंढरपूर हि बँक गेली 40 वर्षे झाले परिचारक गटाच्या ताब्यात आहे. या बँकेतील अनेक ठेवी कमी झाल्या असून, अविश्वासु बँकांमध्ये पंढरपूर अर्बन बँकेची गुंतवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, गेल्या तीन ते चार वर्षात पंढरपूर अर्बन बँकेने सभासदांना लाभांश वितरीत केलेला नाही, तसेच पंढरपूर अर्बन बँकेच्या सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये बोलू दिले जात नसून, लोकशाही ऐवजी दडपशाहीचे धोरण परिचारक यांनी अवलंबल्याचे जनतेसह, सभासदांच्या, महाराष्ट्र शासनाच्या व विशेषतः सहकार खात्यासह रिझर्व बँकेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाषराव वसंतराव भोसले हे 30 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.
पंढरपूर अर्बन बँकेचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सभासदांना दिला जात नसून, वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस ही सभासदांना सभेपूर्वी पंधरा दिवस अगोदर दिली जात नाही.तसेच कोणत्याही घटनेबाबत अथवा व्यवहाराबाबत बँकेच्या सभासदांना कळवले जात नाही, हि गंभीर बाब असल्याचे सुभाष भोसले यांचे मत आहे. तसेच पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर विरधे यांना अनेक वर्षापासून सेवानिवृत्त होऊन सुद्धा कार्यरत ठेवण्याचा परिचारक यांचा हेतू काय? असा स्पष्ट सवाल सुभाष भोसले यांनी विचारला आहे. तसेच पीएमसी बँकेत गुंतवलेल्या चाळीस कोटी रुपयांचे काय झाले? असाही प्रश्न सुभाष भोसले यांनी उपस्थित केला आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या एटीएम मधून तीन कोटी रुपये गहाळ झाल्याचे पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरधे यांचे मत आहे, त्याबाबत बँकेने काय कारवाई केली? तसेच हे पैसे वसूल कसे करणार? असाही प्रश्न सुभाष भोसले यांनी लाक्षणिक उपोषणाद्वारे उपस्थित केला आहे. त्यामुळे पंढरपूर परिसरात पंढरपूर अर्बन बँकेच्या गैरकारभाराविरोधात साधकबाधक चर्चांना ऊत आला असून, फळीवरच्या गप्पांमध्ये विषयाची खुमासदार शैलीत चर्चा होताना दिसुन येत आहे.


0 Comments