LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा 'अक्षय तृतीया' हा आहे. या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

 या दिवशी आपण जे काही करतो ते अक्षय्य राहते. उदाहरणार्थ दानधर्म तसेच सोने नाणे खरेदी यांसारख्या गोष्टी अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही क्षय होणार नाही म्हणून या तिथीला खूप महत्त्व आहे. वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी त्यांच्या नावे दानधर्म पूजा केली जाते. त्यामुळे ते आपल्यावर चांगली कृपादृष्टी ठेवतात. अशी ही मान्यता आहे. या तिथीला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. तसेच भगवान परशुरामांचा जन्म ऋषी जमदग्नी व रेणुका मातेच्या पोटी झाला आहे. ते भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत. त्यामुळे या दिवसाला परशुराम जयंती असेही संबोधतात. भार्गव परशुरामांनी अन्यायी अत्याचारी राजांना मारून धर्माची ध्वजा पुन्हा एकदा स्थापन केलेली आहे तसेच या दिवशी सूर्य कुळातील राजा भगीरथानी हिंदू धर्मातील पवित्र नदी अशी गंगा ती या भूलोकी आणली आहे. जिचे वर्णन 'वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे होती भंगा' अशी पवित्र नदी याच दिवशी या भूलोकी राजा भगीरथानी आपले पूर्वज उद्धरण्यासाठी आणलेली होती. तसेच या दिवशी अन्नपूर्णा मातेचे सुद्धा पूजन केले जाते. त्यामुळे घरामध्ये स्त्रिया अन्नपूर्णे मातेचे पूजन करून स्वयंपाक करतात. त्यामुळे घरात भरभराट होते व घरातील अन्न कधीही संपत नाही अशी धारणा आहे. तसेच लक्ष्मी व कुबेर यांचेही पूजन या दिवशी करण्यात येते. याच दिवशी भगवान नर आणि नारायण यांनीही जन्म घेतला आहे अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या दिवसाचे आणखी महत्त्व वाढते. याच दिवशी वेद व्यास ऋषींनी महाभारत लिखाणास सुरुवात केली होती व लिखाणाचे काम गणपती बाप्पा यांनी केले होते असे अनन्यसाधारण महत्त्व असणारी ही तिथी आहे. महाभारतामध्येच राजा धर्मराजा याने अक्षय पात्र मिळाले होते. ते याच दिवशी मिळाले होते त्यातून धर्मराजा युधिष्ठिर हा सर्वांना अन्नदान करत असे त्यामुळे या तिथीला अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच द्रोपदी वस्त्रहरण याच दिवशी करण्याचा प्रयत्न कौरवांनी केला परंतु द्रोपदी मातेला साडी पुरवण्याचे काम भगवान श्रीकृष्णांनी याच दिवशी केले आहे म्हणून अनेक ठिकाणी वस्त्रदानही केले जाते. तसेच या तिथीला कृष्ण व सुदामाची भेट झाली आहे व गरीब सुदाम यांनी भक्तीपूर्वक शुद्ध अंतकरणाने भगवान श्रीकृष्णांना चार पोह्याचे दाणे भेट दिले व भगवान श्रीकृष्णांनी सुदामाला श्रीमंत केले व सुदाम्याची इच्छित मनोकामना पूर्ण केल्याचे आपल्याला दिसून येते तसेच बद्रीनाथाचे कपाटही याच दिवशी उघडले जाते. तसेच भगवान विष्णूंचा आणखी एक अवतार म्हणजे हायग्रीव याच दिवशी हा अवतार घेतलेला आहे. या अवतारामध्ये त्यांनी वेदांचे रक्षण केलेले आहे. त्यामुळे अजूनच या तिथीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच या दिनी 'महात्मा बसवेश्वर' यांचाही जन्म झालेला आहे त्यामुळे या तिथीला विशेष दुग्धशर्करा योगाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे काम केलेले आहे. या तिथीला सुवासिनि स्त्रिया या चैत्रागौरीचे हळदी- कुंकू करत असतात. तसेच उन्हाळा चा दाह कमी व्हावा म्हणून कैरीचे पन्हे सुद्धा देत असतात. या दिवसापासून अनेक ठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. तसेच आपल्या पूर्वजन प्रीत्यर्थ रांजण डेरा, मातीची भांडीआदी दान देण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. या दिनी सतपात्री लोकांना दानधर्म करण्यात येतो. यादिनी नामस्मरण, दानधर्म व जप केल्याचे अनेक प्रकारे पुण्य लाभते व त्याचा क्षय होत नाही. अशी मान्यता आहे त्यामुळे या तिथीला म्हणजे अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
*-ह. भ. प. सुहासकाका कुलकर्णी, पंढरपूर. मोबाईल नं.-७७५६०९६९७५*

Post a Comment

0 Comments